निवडणूक जिंकावीच लागेल, अन्यथा अदानींच्या भाषेत बोलावे लागेल! आदित्य ठाकरे यांचा मुंबईकरांना सावधगिरीचा इशारा
मिंधे सरकार मुंबई अदानींच्या घशात फुकटात घालतेय, येणारी निवडणूक जिंकावीच लागेल, अन्यथा येत्या दोन वर्षांनंतर मुंबईकरांना मराठी भाषेऐवजी अदानींच्या भाषेतच बोलावे लागेल, असा सावधगिरीचा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
वरळी येथील वाटुमल महाविद्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन कनावजे आदी उपस्थित होते. मुंबई ही कामगार, कष्टकरी मराठी माणसाची आहे. अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत कारण मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्यात येत नाहीत.
संविधानाचा अवमान करून गद्दारांनी सरकार स्थापन केले. निवडणूक लढाई म्हणून नाही तर निवडणूक म्हणूनच लढली पाहिजे. वरळीत काहींना लोकप्रियतेसाठी निवडणूक लढायची आहे. ठीक आहे. पण ही निवडणूक जिंकणे शिवसेनेसाठी गरजेचेच आहे. अन्यथा पुढच्या दोन वर्षांत मुंबईत अदानींची परवानगी घेऊनच मराठी भाषेत बोलावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List