जागर- लांडगा आला रे आला…

जागर-  लांडगा आला रे आला…

>>रंगनाथ कोकणे

उत्तर प्रदेशातील बहराईच जिह्यात लांडगा-मानव संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. गेल्या दोन महिन्यांत लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सात लहान मुलांसह आठ जणांना जीव गमवावा लागला असून 30 जण जखमी झाले आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. वाघ, सिंहांप्रमाणेच लांडग्यांचाही नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. अन्न कमी झालं आहे. मुळात जंगलेच कमी झाल्याने आणि त्यांना खाण्यासाठी भक्ष्य सापडत नसल्याने लांडग्यांची वर्तणूक बदलत आहे. पूर्वी ते मानवी वस्तीपासून दूर राहत होते; पण आता मानवी वसाहती विस्तारत आहेत आणि लांडग्यांच्या अधिवासापर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणून त्यांनी आता माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

कमी होणारे वनक्षेत्र आणि वाढत्या लोकसंख्येने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेतच. त्याचबरोबर पशुपक्षी, प्राणी, वन्य जिवांच्या अधिवास आणि खाद्यान्नावर संकट आले आहे. सध्या विकासासाठी सुरू असलेली आंधळी स्पर्धा पाहता बिनदिक्कत होणारी जंगलतोड चिंताजनक आहे. परिणामी वन्य प्राण्यांच्या आहारावर अणि त्यांच्या राहण्याच्या जागा कमी होत आहेत. अन्न आणि अधिवास यावरच संकट आल्याने वन्य प्राणी पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होत आहेत. खाण्यापिण्याने व्याकूळ झालेले प्राणी शहराकडे जात आहेत. गेल्या काही वर्षांत वन्य प्राण्यांची दहशत शहर आणि जंगलालगतच्या गावांत अधिक पाहावयास मिळत आहे.

अलीकडे उत्तर प्रदेशातील बहराईच जिह्यात लांडग्यांच्या कळपाने दहशत निर्माण केली आहे. या कळपाने आतापर्यंत दहा जणांचा जीव घेतला आहे आणि तब्बल तीस जण जखमी झाले आहेत. अर्थात अशा प्रकारे लांडग्यांची दहशत निर्माण होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही, यापूर्वीदेखील वन्य प्राण्यांनी मुक्त संचार करत दहशत निर्माण केली आहे. लांडग्यांचे वाढते आक्रमण पाहता त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि दहशत कमी करण्यासाठी त्यांना ठार मारण्याचे आदेशही बजावले आहेत. दुसरीकडे माणसाच्या जिवावर उठलेल्या लांडग्यांचे स्वतःचेच अस्तित्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ते लुप्त होण्याची शक्यता वाघांपेक्षा अधिक आहे. वन्य जिवांचे अभ्यास आणि तज्ञांच्या मते, वन्य प्राण्यांत सर्वात लाजाळू प्राणी लांडगा आहे. ते माणसाच्या लवकर संपर्कात येत नाहीत आणि ते मनुष्यावर हल्लाही करत नाहीत. लाजाळू वृत्ती असतानाही लांडगे माणसांवर का हल्ले करत आहेत? वन्य प्राणी, लांडगे किंवा अन्य प्राणी माणसांना अकारण त्रास देत नाहीत, पण त्यांच्याच अन्नावर आणि अधिवासावर डल्ला मारला जात असेल तर ते गप्प कसे बसतील?

उत्तर प्रदेशातील बहराईच जिह्याचा काही भाग सखल आहे. तो दक्षिण नेपाळ आणि उत्तर हिंदुस्थानच्या सीमेवरील दलदलीचा भाग ओळखला जातो. या ठिकाणी पूर येण्याचे प्रमाण अधिक राहते. कोणताही वन्य प्राणी हा विनाकारण आपला अधिवास सोडत नसतो. आहार कमी मिळत असेल तर तो त्यासाठी आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात शहर, ग्रामीण भागाकडे वळतो. अशा वेळी नरभक्षक प्राणी पाळीव प्राण्यांना किंवा माणसांना लक्ष्य करतात. शाकाहारी प्राणीदेखील पिकांची नासाडी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

तज्ञांच्या मते, लांडगे, श्वान किंवा अन्य प्राण्यांत एक समान धागा आहे. त्यांना माणसाच्या रक्ताची चटक लागली की, ते अधिक आक्रमक होतात. या कारणांमुळेच बहराईच येथे लांडग्यांचे कळप माणसांना लक्ष्य करत आहेत. त्यांचा हल्ला बहराईच जिह्यात होत असला तरी संपूर्ण देशासाठी ही घटना धक्कादायक ठरली आहे. लांडग्यांवर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन-शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तरीही लांडग्यांचे हल्ले अद्याप कमी झालेले नाहीत.

हिंदुस्थानात लुप्त होणाऱया वन्य जिवांच्या श्रेणीत लांडग्यांचा समावेश होतो. देशातील त्यांची संख्या खूपच कमी आहे. कदाचित नेपाळमधून अन्न आणि अधिवासाच्या शोधासाठी किंवा अन्य कारणांसाठी बहराईच जिह्यात येत असतील, असेही असू शकते. कारण काहीही असले तरी लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे देश आणि प्रदेशांसमोर नवीन संकट अणि प्रश्न निर्माण होत आहेत. लांडगे किंवा अन्य वन्य प्राण्यांत मानवावर हल्ले करण्याची वृत्ती का वाढत आहे? माणसापासून सतत दूर राहणारे प्राणी माणसांचाच का जीव घेत आहेत? हवामान बदलामुळे वन्य प्राण्यांच्या मूळ स्वभावात बदल होत आहे का? माणसांवरच हल्ले करण्याचे नेमके काय कारण असू शकते? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

सरकार मानवी वस्तीच्या विस्तार अणि शहरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जंगलतोड करत आहे. मनुष्याच्या विकासावर लक्ष देत असताना वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा विचार केला जात नसल्याचे स्पष्टपणे दिसते. जंगलाची बेसुमार तोड आणि वाढते शहरीकरण पाहता प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. या समस्या माणसासाठी धोकादायक नाहीत, तर प्राण्यांच्या अस्तित्वावरच टांगती तलवार ठरू शकते.

अलीकडच्या काळातील एका अभ्यासानुसार, आगामी वर्षांत लोकसंख्यावाढीमुळे प्राण्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक अधिवासांवर माणसाचा ताबा राहणार आहे. साहजिकच वन्य प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यात संघर्ष वाढणार आहे. दोघेही आपल्या अस्तित्वासाठी लढाई करतील. वन्य प्राण्यांची वाढती दहशत ही गंभीर समस्या आहे. त्यासाठी सर्वंकष दृष्टिकोनाची गरज आहे. सरकारने जंगलाचे संरक्षण आणि वन्य प्राण्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जंगल आणि मानवी वस्ती यांच्या मर्यादा आखून ठेवायला हव्यात. ही बाब केवळ मानवाच्या सुरक्षेपुरतीच मर्यादित नाही.

यासंदर्भात लवकर ठोस रणनीती आखली नाही तर समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे केवळ वन्य प्राण्यांची संख्या कमी होणार नाही, तर मानवी जीवनदेखील अडचणीत सापडू शकते. मानवी जीवनाच्या सुरक्षेबरोबरच वन्य प्राण्यांच्या हिताचेही संरक्षण करायला हवे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन्य जिवांसह मानवाबरोबर शांततामय सहअस्तित्व निश्चित केल्यानेच या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024
>> नीलिमा प्रधान मेष – चर्चेत वाद वाढेल मेषेच्या षष्ठेशात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. कायद्याला...
भाजप पक्ष खोट्या गोष्टी पसरवतोय! राहुल गांधींचा जोरदार पलटवार
महाराष्ट्रातील पीडब्ल्यूडीच्या कामगारांना मोठा दिलासा, हंगामी कामगारही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टीचे हकदार
भाजपच्या गॅसवर शिजणार ईदची बिर्याणी; ईद, मोहरमला दोन सिलिंडर मोफत, अमित शहा यांची घोषणा
जबाबदारी राज्य सरकारकडे अन् शिव्या मी खातोय, मुंबई-पुणे, कल्याण-नगर रस्ते तीन महिन्यांत दुरुस्त करा; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला इशारा
आरक्षित सरकारी भूखंडांवरील बांधकामांवर हातोडा पडणार, हरित लवादाने घेतली कठोर भूमिका
श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती, बंगळुरूत तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले