महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे पहिजे नाही तर… ‘या’ मराठी सिनेमातील सीन तुफान व्हायरल
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं राजकीय मनोमिलन होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यायलाच हवं असं अनेकांना वाटत आहे. दोघे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकतं, असं अनेकांना वाटतं. दरम्यान राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलखतीनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येतील.. याच प्रतीक्षेत देखील महाराष्ट्राची जनता आहे.
“महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, आमच्यातील वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, राहणं, यात कोणतीही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण याठिकाणी विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र येण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. पण यामध्ये हित फक्त महाराष्ट्राचं असेल… अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली. यानंतर सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एवढंच नाही तर, मराठी सिनेमातील एक सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देखील दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर ज्या सिनेमाचा एक सीन व्हायरल होत आहे, त्या सिनेमाचं नाव राज का ‘रण’ असं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वाच्या घटनेवर आधारित होता. सिनेमात राज ठाकरे यांची भूमिका अभिनेते प्रसाद ओक आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका दीपक करंजीकर यांनी साकारली होती.
सिनेमात एक सीन आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सीनमध्ये वेगळे झालेले भाऊ एकाच मंचावर येतात. सीनमध्ये मंच हलताना दिसत आहे. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील हलताना दिसत आहे. महाराजांचा पुतळा हलताना पाहून दोन्ही भाऊ एकत्र येतात… त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या हितासाठी देखील दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे… असं अनेकांचं म्हणणं आहे.
व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘सर्वांची हीच इच्छा आहे … महाराष्ट्राला तुम्ही एकत्र असण्याची गरज आहे नाहीतर काहीच होऊ शकत नाही..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघी बंधूं एकत्र येणं कठीणच आहे , पण दोघींनी सगळ बाजूला सारून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला ‘दोघांनी एकत्र येणं काळाची गरज…’ सध्या सोशल मीडियावर सिनेमातील सीन तुफान व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List