अंगाची लाही लाही, रस्ते ओस; सांगलीत पारा 40 अंशांवर
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा प्रचंड कडाका वाढला असून, कमाल पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. उन्हामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडत आहेत. आणखी दोन-तीन दिवस तापमानात वाढ कायम राहणार आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा अधिकच कडक जाणवत आहे. फेब्रुवारीपासून तापमान वाढत आहे. मार्च महिन्यात दाह अधिकच वाढला होता. एप्रिल महिन्यात तर जिल्हा भाजून निघत आहे. मागील महिन्याभरात दररोज सरासरी तापमान किमान 36 ते कमाल 40 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. सांगली शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कडाक्याचे ऊन आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा पारा 38 अंशावर राहिला आहे.
उन्हाचा कडाका असल्याने शहरातील बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडत आहेत. तसेच बाजारात कुठेतरी नागरिक दिसतात. तर ग्रामीण भागात सकाळी बारानंतर नागरिक आपापले घर गाठत आहेत. त्यामुळे गावागावांतही शुकशुकाट जाणवत आहे. नागरिकांनी उन्हात घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असून, दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. पुढील तीन-चार दिवस तापमानात वाढ कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List