खेड तालुक्यात पाणीटंचाईच्या भीषण झळा; गावांसह, वाड्या-वस्त्यांना 4 शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू
उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या भीषण झळा ग्रामस्थांना बसू लागल्या आहेत. पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करण्याची वेळ आली आहे. खेड तालुक्यातदेखील पाणीटंचाईच्या झळा वाढल्या असून, चार शासकीय टँकरने पाच गावठाणांतील ३ हजार २८८ लोकसंख्येला, तर ३७ वाड्यावस्त्यांतील ७हजार ८२५ असे मिळून ११ हजार ११३ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत असून, यासाठी चार खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.
तालुक्यातील उन्हाळी आवर्तने चासकमान धरणातून कालव्याद्वारे सुरू असून, सध्या धरणात २१.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी २१.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चासकमान धरणांतर्गत कळमोडी धरणातील पाणी चासकमान धरणात विसर्ग सोडण्यात आल्याने कळमोडी धरणात ४७.३९ टक्के पाणीसाठा आजमितीला शिल्लक आहे. तर, गतवर्षी ६५.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भामा आसखेड धरणात आजमितीला ३८.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षी २६.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
सध्या उष्णतेमुळे जलसाठे, विहिरींनी पाणीपातळी खालावल्याने जल उद्भव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत, पूर्वपट्ट्यातील अवर्षण प्रवण गावांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील गावांसह परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असली, तरी आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था योजनांबाबत झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना उन्हाळ्यात किती पाणी राहणार, याचा अंदाज न बांधता, थेट विहिरी खोदण्यात येऊन पाणीपुरवठ्याची कामे करण्यात आली.
घाटात टँकरमधून पाण्याची फवारणी
सध्या उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला असून, कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका शेतीकामांना बसताना दिसत आहे. तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील श्रीक्षेत्र गुळाणी परिसरातील वाकळवाडी येथे चक्क बैलगाडा घाटाला शासकीय टँकरमधील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार घडला. वाकळवाडी गावाची प्रथेनुसार कुलदैवताची यात्रा संपन्न झाली असताना, वाढदिवसाच्या नावाखाली ही बैलगाडा शर्यत भरवूनसुद्धा या शर्यतींना महसूल विभागाने डोळझाक करून परवानगी दिली. वाकळवाडी येथील बैलगाडा घाटात शासकीय टँकरने पाणी मारण्यात आल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य नरेंद्र वाळुंज यांनी गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे केली. याची दखल घेऊन संबंधित पुरवठादार संस्थेला लेखी कळवून संबंधित पाण्याचा टँकर दुसऱ्या मार्गावर वळवून तात्पुरती मलमपट्टी केल्याचे दिसून आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List