हम्पीचा खुयाकवर वेगवान विजय; चीनची झू जीनर विजयासह आघाडीवर कायम
फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेची सहावी फेरी निकाली सामन्यांमुळे चित्तथरारक ठरली. हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पीने मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकवर मिळवलेला विजय आजच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरला, मात्र चीनच्या झू जीनर हिने हिंदुस्थानच्या वैशाली रमेशबाबूवर मात करताना 5 गुणांसह आघाडीचे स्थान कायम राखले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने अमनोरा द फर्न येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत आता कोनेरू हम्पी 4.5 गुणांसह केवळ अर्ध्या गुणाच्या अंतराने झू जीनर पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर असून दिव्या देशमुख 4 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या सामन्यात हम्पीने आपली जुनी प्रतिस्पर्धी मुनगुंतूलविरुद्ध इटालियन ओपन पद्धतीने डावाची सुरुवात केली. मात्र, मुनगुंतूलने प्रत्युत्तर देताना डावाच्या सुरुवातीलाच चूक केली. तिने आठव्या चालीत वजीर हलवताना केलेली घाई हम्पीच्या पथ्यावर पडणारी ठरली. त्यातच 15 व्या चालीत मुनगुंतूलने केलेली घोडयाची चाल तिच्या अडचणीत भर घालणारी ठरली.
हम्पीने वजीराच्या बाजूला पॅसलिंग करून पटाच्या मध्यावरून सुरू केलेले आक्रमण मुनगुंतूलच्या राजावर पेंद्रित केले. हम्पीने मुनगुंतूलच्या वजीर आणि प्याद्याच्या बदल्यात दोन हत्तींचे बलिदान दिले. यावेळी मुनगुंतूलवर केवळ 8 मिनिटांत 21 चाली करण्याचे दडपण होते. हम्पीने त्याचा फायदा घेत वजीर व हत्तीच्या सहाय्याने शहमत करत 33 व्या चालीला विजयाची पूर्तता केली. ‘15व्या चालीत मुनगुंतूलने केलेली चूक आपल्याला निर्णायकरीत्या फायदेशीर ठरली. शनिवारची सुट्टीची विश्रांती आजच्या सामन्याची पूर्वतयारी करण्यासाठी खूपच उपयोगी झाली, असे हम्पीने सामन्यानंतर सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List