जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटी; रामबनमध्ये जमीन खचली, रस्ते वाहून गेले… तिघांचा मृत्यू
जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटी होऊन झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे आणि जमीन खचल्यामुळे जम्मू येथील विविध ठिकाणी तसेच कश्मीरमधील रामबन जिह्यात अक्षरशः हाहाकार माजला. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक घरे आणि रस्ते वाहून गेले असून यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
रामबन जिह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यामुळे जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने भूस्खलनामुळे जमिनीखाली गाडली गेली असून अनेक वाहने अडकून पडल्याचे चित्र आहे. किश्तवाड-पद्दर रस्ताही बंद असून येथील अवजड वाहतूकही थांबवण्यात आली आहे. भूस्खलनामुळे डोंगरावरील जमीनही खचली आणि घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक खोळंबली.
250 किलोमीटर महामार्गावर अडकले प्रवासी
भूस्खलनामुळे नशरी ते बनीहालदरम्यान डझनभराहून अधिक ठिकाणी मातीचा ढिगारा आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. परिणामी 250 किलोमीटरच्या या महामार्गावर 100 हून अधिक प्रवासी अडकून पडले. प्रत्येक ऋतूत कश्मीर आणि संपूर्ण देशाशी कनेक्ट असणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.
हॉटेल फुल्ल, पर्यटकांमध्ये उत्साह
सर्व हॉटेल फुल्ल आहेत. पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अनेक पर्यटक फिरण्यासाठी, साईट सीनसाठी जात आहेत, असे मोहम्मद शफी बट यांनी सांगितले. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे वैष्णोदेवीपर्यंतची हेलिकॉप्टर सेवा तूर्त बंद आहे. अनेकजण श्रीनगरमध्येच थांबले आहेत. अनेक पर्यटक 22 एप्रिलला परतीच्या प्रवासासाठी निघणार होते, परंतु वैष्णोदेवी दर्शन लांबल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एक दिवस उशीर होईल. सर्वजण 23 एप्रिलला मुंबईला परततील, अशी माहिती ठाण्यातील प्रशांत टूर्स अॅण्ड ट्रव्हल्सच्या प्रशांत सानप यांनी दिली.
धर्मकुंड गावातून 100 लोकांना बाहेर काढले
रामबन जिह्यातील चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाल्याने 20 घरे पूर्णपणे कोसळली आणि वाहून गेली. आणखी 25 ते 30 घरांचे नुकसान झाले. धर्मकुंड पोलिसांनी सुमारे 100 लोकांना येथून सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले.
पर्यटक सुरक्षित
रामबन येथे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे येथील परिस्थिती कधी पूर्ववत होईल, दोन दिवस लागतील की तीन दिवस हे प्रशासनच सांगू शकते, परंतु मुगल रोड खुला आहे, ट्रेन सुरू आहेत, हवाई मार्ग खुला आहे. त्यामुळे पर्यटक येऊ-जाऊ शकतात, ते सुरक्षित आहेत, अशी माहिती जम्मू-कश्मीरमधील हॉटेल व्यावसायिक मोहम्मद शफी बट यांनी दिली. जम्मू आणि कश्मीरमध्ये संपर्क सुरू आहे. जवाहर बोगद्याचा रस्ता बंद आहे, परंतु मुगल रोड सुरू असून या पर्यायी मार्गाचा वापर करताना केवळ 20 किलोमीटरचा फरक पडेल, असेही बट म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List