बिडवलकर हत्या प्रकरणात खरा आका निलेश राणेच, वैभव नाईक यांच्या आरोपाने खळबळ
बिडवलकर हत्या प्रकरणात माझ्यावर आरोप करण्यात आले. परंतु मी ज्याची विचारणा केली होती, त्यावर आमदार निलेश राणे काहीही बोलू शकले नाहीत. त्या हत्या प्रकरणात सिद्धेश शिरसाटला पकडल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निलेश राणेंनी पोलीस अधीक्षकांना दोन वर्षापूर्वीची प्रकरणे आता कशी काढता? अशी विचारणा केली. जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा, असे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे बिडवलकर हत्या प्रकरणातील खरा आका निलेश राणेच आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वैभव नाईक यांनी केला आहे.
जनतेला माझी राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी माहीत आहे. यापूर्वी अंकुश राणे खून प्रकरण, छत्रपती पुतळा दुर्घटना प्रकरणात माझ्यावर असेच आरोप करण्यात आले होते. आता तुमची सत्ता आहे. माझे सीडीआर काढा, मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वैभव नाईक यांनी निलेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला. निलेश राणे यांच्या बाजूला पत्रकार परिषदेत काल बसलेले लोकच वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवाल्यांकडून तीन हजार गोळा करत आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
निलेश राणे यांनी आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासावी. निलेश राणे यांनी ज्या कुटुंबावर वाईट वेळ आणली आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. माझे फोटो कुठेच सापडले नाहीत. परंतु सिद्धेश शिरसाटसोबत निलेश राणे यांचे फोटो त्यांच्याच ट्विटर अकाउंटवर आहेत. त्यामुळे या प्रकरणात निलेश राणेच आका आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
जर तुमच्यात हिंमत असेल तर, तुमचे कॉल डिटेल्स जनतेसमोर जाहीर करा. पोलिसांनी मला कधीही बोलावले तरी मी चौकशीला जाण्यासाठी तयार आहे. मला अडकवण्यासाठी सगळी टीम कामाला लागली आहे. या प्रकरणात आकाच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणात ही हत्या उघडकीस आली आहे. सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी आकाचा प्रयत्न आहे. दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण पोलीस का उकरता? अशी विचारणा कोणी केली होती. या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली म्हणून माझ्यावर निलेश राणे टीका करत आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List