2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेला राज ठाकरे यांनी सुरुवात केली. त्यांनी स्वत: तसा प्रस्ताव दिल्यावर उद्धव ठाकरे यांनी अटी शर्तीसह युतीस तयार असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या या अटी शर्तीला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विरोध करत काही प्रश्न विचारले आहे. तसेच युतीचा निर्णय राज साहेब घेतील, पण कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आपण बोलत असल्याचे त्यांनी म्हटले.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
संदीप देशपांडे यांनी शिवसेना भाजप युतीचा प्रवास सांगितला. ते म्हणाले, श्रीधर पाटणकरांनी २०१७ रोजी माझी भेट घेतली. पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, आमचे भाजपसोबत लग्न आहे, आधी लग्न मोडून द्या, मग साखरपुडा करू. २६ जानेवारीला भाजपसोबत युती तोडली यानंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलणे बंद केले, असा आरोप देशपांडे यांनी केला.
शिवसेनेने २०१४ आणि २०१९ ला आम्हाला धोका दिला, असे सांगत संदीप देशपांडे म्हणाले, २०१९ पर्यंत भाजप शिवसेनेचा शत्रू नव्हता. भाजप शिवसेनेसाठी गोड होता. चांगला होता. कारण सत्तेत ५०-५० टक्के वाटा मिळत होता. २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या. तोपर्यंतही भाजप चांगला होता. पण २०१९ मध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन त्यांचे फिस्कटले तेव्हा भाजप महाराष्ट्रद्रोही झाला. त्यावेळी भाजप वाईट झाला. २०१७ मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते, आम्ही २५ वर्ष भाजपमध्ये सडलो. पण त्यानंतर त्यांनी भाजपसोबत २०१९ मध्ये युती केली. लोकसभेत युती केली. त्यांना मुख्यमंत्री केले असते तर सेनेसाठी भाजप आजही महाराष्ट्रद्रोही ठरला नसता, अशी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेना उबाठावर केली.
आता उद्धव ठाकरे पवार साहेबांना, काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहे, असा आरोप करत संदीप देशपांडे म्हणाले, एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिल्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. युती करायची की नाही, याबाबत निर्णय राज ठाकरे घेणार आहे. पण तुम्ही सोनिया गांधींना भेटणार, तुम्ही शरद पवारांना भेटणार? हे कसे चालणार आहे. ज्या काँग्रेसने २००८ मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केले म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले, ते महाराष्ट्र प्रेमी कसे? त्या काँग्रेसोबत उद्धव ठाकरे कसे गेले? आम्ही भाजपसोबत किंवा शिंदेसेनेसोबत गेलो तर तुम्ही आम्हाला वाईट ठरवणार आहे. त्यानंतर तुम्ही जे कराल ते योग्य कसे? असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List