वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाबाबत भूमिका स्पष्ट केली. वक्फ बोर्डातील विधेयकास विरोध करण्याबाबतची कारणे सांगितली. आपली जी भूमिका होती, ती भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भारतीय कामगार सेना ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या विधेयकाबाबत म्हणाले, विधेयकात गैर मुस्लीम व्यक्ती वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्याची तरतूद होती. त्या तरतुदीला आमचा विरोध होता. आम्ही जो प्रश्न विचारला तोच प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. गैर मुस्लीम लोक वक्फ बोर्डावर आज घेतले जातील, मग उद्या मंदिरांमध्ये गैर हिंदूंच्या नियुक्ती करणार नाही, याची काय खात्री आहे. आंधळेपणे आम्ही पाठिंबा देणार नाही. हिंदी बोलले म्हणजे हिंदू नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत, असे रोखठोकपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वक्फ बोर्ड, भाषा सक्ती यावरुन भांडणे लावायची आणि विधेयके संमत करावी, अशी कामे सरकार करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘ज्या प्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरला, त्याप्रमाणे कामगार रस्त्यावर उतरला नाही. कोणीही एकत्र येता कामा नये हेच त्यांचे मिशन आहे. कोणालाही संघटीत होऊ द्यायचे नाही, दबावाखाली ठेवायच, चिंताग्रस्त ठेवायच अन् आपले हित साध्य करुन घ्यावे, अशी त्यांची रणनीती सुरू आहे.’
उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यास हात घातला. राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयास विरोध करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही प्रेमाने सगळे ऐकून घेऊ. पण सक्ती कराल तर सगळे उखडून फेकू. येथे अमराठी पिढ्यान पिढ्या राहत आहेत. आम्ही सुरु केलेल्या मराठी शिकण्याचा वर्गावर ते येत आहेत. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. येथील मीठ खातात आणि मराठीला विरोध करता? आपले सरकार असताना असे धाडस करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List