संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली…, तुम्हालाही अश्रू नाही आवरणार
बीड जिल्ह्याच्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. वडिलांचे फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या वैभवी देशमुख?
हे दुःख कधीच संपणार नाही, ते आमच्या घरातील प्रमुख व्यक्ती होते. हे दुःख कधीच आमच्या मनातून जाणार नाही. फोटो बघितल्यानंतर आमच्या कुटुंबाची लढण्याची क्षमता संपून जात आहे, आमची सहनशीलता संपत आहे. दुःख त्या दिवशी सुद्धा तेवढंच होतं आज आणि यापुढेही तेवढेच राहणार आहे. आम्ही आता दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत, माझ्या वडिलांना न्याय द्यायचा आहे. हे सगळं कोण घडवून आणतय हा प्रश्न आमच्या समोर सुद्धा आहे. जे फोटो आहेत त्यामध्ये माझ्या वडिलांना अमानुष पद्धतीने मारहाण केली, मृतदेह तुमच्यासमोर असताना तुम्ही हसताय धिंगाणा करताय, त्यांच्यासमोर फोटो काढताय त्याचं आम्हाला किती दुःख आहे.
मला माझ्या गावासाठी आणि मुला – मुलींसाठी जगू द्या हे शब्द ऐकल्यानंतर अश्रू अनावर होत आहेत. आज ते घरी येत नाहीत तरी आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट पाहतोय, ते घरी येत नाहीत.
आता आम्ही वाट कुणाची बघायची ते घरी येत नाहीत हा प्रश्न आहे. ही घटना खंडणीमुळे झाली आहे, ते लोक इतके अमानुषपणे कृत्य करतात, त्याच्यामागे कोणाचा हात आहे.
जी खंडणी जाते ती नेमक कोणासाठी जाते, ती कोणापाशी जाते, हे जे लोक करण्यासाठी आले होते त्यांना कोणी पाठवलं होतं? असा सवाल वैभवी देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बारामतीमध्ये जो मोर्चा होतोय त्या मोर्चात कुटुंबीय सहभागी होणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आमची विनंती एकच आहे लवकरात लवकर न्याय द्या, जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, असं वैभवी देशमुख यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List