महाराष्ट्रानेच ‘त्या’ बाईवर हक्कभंग आणला पाहिजे, संजय राऊत यांचे नीलम गोऱ्हेंवर खळबळजनक आरोप
नवी दिल्लीत झालेले अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यापेक्षा राजकीय आरोपांनी गाजले. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात धक्कादायक आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटांकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले. हे आरोप उपसभापती म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
संजय राऊत म्हणाले की, नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत. नीलम गोऱ्हे यांचे कालचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? काही लोकांच्या मर्जीमुळे त्या आल्या अन् गेल्या. परंतु जाताना ताटात घाण करुन गेल्या. त्यांचे विधान परिषदेतील कर्तृत्व काय? त्यांनी कोणकोणाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले, नाशिकच्या विनायक पांडे यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले. तुम्ही ते विनायक पांडे यांना जावून विचारा. त्या विनायक पांडे यांनी कसे तरी ते पैसे वसुल केले. ज्या उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केले, त्यांच्यावर तुम्ही आरोप करतात, असा राऊत यांनी सांगितले.
लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात?
संजय राऊत यांनी आरोप करताना सांगितले की, नीलम गोऱ्हे यांनी काल पत्रकारांना सांगितले की, मी महामंडळाला ५० लाख दिले. त्यानंतर माझा कार्यक्रम लावला. ते लोकांनी रेकॉर्ड केले आहे. त्या लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात? प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात? माझ्याकडे सर्व माहिती आहे.
नीलम गोऱ्हे यांच्यावर उपसभापती म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून टीका केली आहे. मी २४ वर्षे राज्यसभेत आहे. सर्व कायदे आम्हालाही माहीत आहेत. आम्ही हक्कभंग पाहिला आहे. कारागृहात गेलो आहे. आता अधिवेशन सुरु नाही. त्या कशाला हक्कभंग करतील. खरंतर महाराष्ट्राने त्या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. त्या विश्वासघातकी बाई आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
हे ही वाचा…
साहित्य संमेलनातील नीलम गोऱ्हे यांचा आरोप, शरद पवारांची जबाबदारी, संजय राऊत यांचा थेट पवारांवर हल्ला
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List