गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट?
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. ठाकरे गटाचे तर आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी आमदार निवडून आले. तर मनसेला साधं खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही विजयी होऊ शकले नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही लोकांनी तर बॅनर लावून या दोन्ही भावांना एकत्र यावे म्हणून साकडं घातलं आहे. पण दोन्ही भावांकडून त्याला काही प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी आज एक सुखद चित्र पाहायला मिळालं. दोन्ही भाऊ एकत्र आले. गप्पा मारल्या, हास्य विनोदात रमले. तेही एका लग्नाच्या निमित्ताने. त्यांचे फोटोही व्हायरल झाले असून अनेकांना हे फोटो वाटून हायसं वाटलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्नानिमित्ताने एकत्र आले होते. अंधेरी येथे हा लग्न सोहळा होता. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला. तिघेहीजण हास्यविनोदात रमलेले दिसले.
अन् कॅमेऱ्यांचा किलकिलाट…
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले. तिघांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगला होता. तिघेही एकाच फ्रेममध्ये आल्यानंतर कॅमेरामनची फोटो काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. तिघांचीही हास्यविनोद करतानाची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामन सरसावले होते. क्षणार्धात कॅमेऱ्याचा किलकिलाट सुरू झाला. मात्र, तिघांनीही कॅमेऱ्यांकडे न पाहता गप्पा मारणं सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे आता दोन्ही बंधू मराठी माणसांसाठी एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे.

raj thackeray
एकत्र या… बॅनरबाजी
विधानसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी पुण्यापासून मुंबईपर्यंत बॅनरबाजी सुरू झाली होती. ठाकरे बंधूनी एकत्र यावं म्हणून अगोदर पुण्यात बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आले होते. यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं.
गेल्या तीन महिन्यातील भेटी
15 डिसेंबर 2024
मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती.
22 डिसेंबर 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
23 फेब्रुवारी 2025
शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट आणि मन मोकळ्या गप्पा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List