चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने लग्नानंतर आणि बाळंतपणानंतर कामातून ब्रेक घेतला. मुलाच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ देता यावा यासाठी तिने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. मात्र सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता चार वर्षांच्या ब्रेकनंतर दीपिकाने छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी त्यांचं पाककौशल्य दाखवून परीक्षकांकडून गुण मिळवतात. यात सर्वोत्तम कामगिरी करणारा विजेता ठरतो. दीपिकाला स्वयंपाकाची खूप आवड असल्याने तिने या शोमधून पुन्हा कामाला सुरुवात केली. शोमध्ये तिने बनवलेल्या रेसिपीज प्रेक्षकांना आणि परीक्षकांनाही आवडू लागल्या होत्या. तिच्या कामगिरीचं कौतुक होऊ लागलं होतं. परंतु काही एपिसोड्सच्या शूटिंगनंतर तिने हा शो मध्येच सोडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दीपिकाचे चाहते नाराज झाले आहेत.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी दीपिकाने शो सोडल्याची माहिती दिली आहे. आरोग्याच्या कारणास्तव तिने हा शो मधेच सोडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, “तिची तब्येत बरी नाही आणि तिच्या हातालाही दुखापत झाली आहे. त्यामुळेच तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने एकदा डॉक्टरांना दाखवल होतं आणि तिचं दुखणं कमीसुद्धा झालं होतं. मात्र पुन्हा तिच्या हाताच्या वेदना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शोमध्ये सतत ये-जा करणं योग्य वाटत नाही. लोक काय म्हणतील या विचाराने तिनेच माघार घेतली आहे.” दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने त्याच्या एका व्लॉगमध्ये दीपिकाच्या हाताच्या दुखापतीबद्दल सांगितलं होतं. दीपिकाच्या हाताचं दुखणं फार जुनं आहे आणि आता त्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढलंय. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, असं त्याने स्पष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये स्वयंपाक करताना हातावर अधिक ताण येत असल्याने दीपिकाला अधिक त्रास होत असल्याचं उषा नाडकर्णींनी सांगितलं.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोचं सूत्रसंचालन प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान करत आहेत. आतापर्यंत या शोमधून चंदन प्रभाकर आणि अभिजीत सावंत हे दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. सर्वांत आधी कॉमेडियन चंदन प्रभाकर या शोमधून बाद झाला. आता दीपिकाने मधेच हा शो सोडल्यानंतर त्यात नऊ स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये उषा नाडकर्णी, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, कबिता सिंह, तेजस्वी प्रकाश, फैजल शेख, गौरव खन्ना, अर्चना गौतम यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आयेशा जुल्काने यामध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List