पंढरी‘दादां’च्या आठवणीने गिरणगावकर गहिवरले, ध्येयवादी पत्रकाराला सर्वपक्षीय आदरांजली
निर्भीड आणि ध्येयवादी पत्रकार दिवंगत पंढरीनाथ (दादा) सावंत म्हणजे गिरणगावचा अभिमान. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना आज अनेकांनी व्यक्त केली. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण यासाठी लेखणी चालवणाऱ्या आणि कामगार चळवळीबद्दल सदैव आस्था बाळगणाऱ्या पंढरीनाथ सावंत यांच्या आठवणीने उपस्थित हेलावले.
शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने पंढरीनाथ सावंत यांची शोकसभा काळाचौकी येथील मम्माबाई हायस्कूलमध्ये झाली. यावेळी सर्वक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार, लेखक, चित्रकार गायक असे सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचे पैलू उलगडण्यात आले. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या कामातून इतरांना काय मिळेल याचा पंढरीदादा नेहमी विचार करत, जीवनाचा गौरव होईल असे आयुष्य जगले. त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन अनेक पत्रकार घडावेत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, मनोज जामसुतकर, सुनील शिंदे, महेश सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, राष्ट्रवादीचे प्रवीण खामकर, ऍड संजय पाटील, काळाचौकी उत्सव मंडळाचे अमन दळवी, आरपीआयचे मिलिंद सुर्वे, काँग्रेसचे भाऊसाहेब आंग्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदींनी सावंत यांना शब्द- सुमनांजली वाहिली. यावेळी सावंत यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी पंढरीनाथ सावंत यांचे पुत्र प्रबोधन सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पंढरीनाथ सावंत यांनी विचारांसाठी आयुष्य वेचले. त्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही, मराठी माणसं, मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा परमार्थ पाहिला, असे अरविंद सावंत म्हणाले. सावंत यांचे ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते राहिले. त्यांच्याशी भेट झाल्यावर अनेक विषयांवर बोलणे व्हायचे. स्थानीय लोकाधिकार समितीच्या कामावर चर्चा करायचे, अशा आठवणी अनिल देसाई यांनी जगवल्या
सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शिवसेना भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख राम सावंत, सहसंघटक हेमंत कदम, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, रवि चव्हाण, शाखाप्रमुख रमेश रावल, सुहास भोसले, निगाप्पा चलवादी, सलीम शेख, विनोद शिर्के आदींनी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List