चुलबुली, उत्साही अन् तितकीच गोंधळलेली.. प्राजक्ताचा वेगळा अंदाज
अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे. पण त्याचवेळी ती गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारत आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. धमाल, मस्ती, हास्य यांसह येत्या 28 फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.
या चित्रपटाविषयी प्राजक्ता म्हणाली, “कसलेल्या विनोदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी हे माझ्यासाठी खूप खास होतं. माझ्या आजवरच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा मला विश्वास आहे.”
प्राजक्ता माळीसोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रॉडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List