डोंबिवलीच्या सोनल बिझनेस पार्कमध्ये शॉर्टसर्किटने आग, धुराचे लोट उठले.. फोटोशूट करणारे नवरा – नवरी पळत सुटले
डोंबिवलीतील गजबजलेल्या घरडा सर्कल येथील सोनल बिझनेस पार्कमध्ये आज दुपारी आगीचा भडका उडाला. मीटर केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ही दुर्घटना घडली. तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर असलेल्या बैंक्वेट हॉलमध्ये धुराचे लोट उठले आणि कहाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली. फोटोशूट करणारे नवरा नवरीही अक्षरशः पळत सुटले. सुदैवाने अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील सोनल बिझनेस पार्कच्या इमारतीत हॉस्पिटल, डायलिसिस सेंटर, बँक्वेट हॉल यांसह अन्य व्यावसायिक गाळे आहेत. दुपारी दोनच्या दरम्यान तळमजल्यावर असलेल्या मीटर केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. तातडीने आगीची माहिती एमआयडीसी आणि केडीएमसीच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु काही क्षणातच धुराने संपूर्ण इमारत व्यापली.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर सोनल बँक्वेट हॉलमध्ये लग्नसोहळा सुरू होता. धुराचे लोट हॉलमध्ये घुसले. त्यामुळे शेकडो वहऱ्हाडींमध्ये एकच गोंधळ उडाला. अग्निशमन जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तातडीने बँक्वेट हॉलमध्ये उपस्थित असलेल्या 200 ते 300 क्हाडींना दुसऱ्या जिन्याने सुखरूप बाहेर काढले. तसेच इमारतीत असलेल्या हॉस्पिटल, दवाखाने, डायलिसिस सेंटर आणि अन्य दुकानदार व ग्राहकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले.
यामुळे अनर्थ टळला
अग्निशमन दलाचे अधिकारी रवी गोवारी यांनी तत्काळ महावितरणला संपर्क करून या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पाण्याचा मारा करून मीटर केबिनमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान बैंक्वेट हॉलसाठी महापालिकेची परवानगी होती का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List