रणवीर अलाहबादियाला सुप्रिम कोर्टाकडून दिलासा नाही; नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादियाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. दोन-तीन दिवसांत हे प्रकरण सूचीबद्ध केलं जाईल, असं सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलंय. आसाममध्ये पोलिसांनी रणवीरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी CJI कडे लवकर सुनावणीची मागणी केली होती.
‘बीअर बायसेप्स’ या ऑनलाइन टोपणनावाने प्रसिद्ध असलेला युट्यूबर रणवीर अलाहबादियाने त्याच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआरविरुद्ध दिलासा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारला होता. त्यावरून त्याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. रणवीने वकील अभिनव चंद्रचूडमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे त्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेले एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. गुवाहाटी पोलिसांनी त्याला आणि शोमध्ये सहभागी झालेल्या इतरांनाही समन्स बजावले आहेत. अटकेच्या भीतीने रणवीरने अटकपूर्व जामीनदेखील मागितला आहे.
या याचिकेवर लवकर सुनावणीची विनंती रणवीरच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही विनंती नाकारली आहे. सरन्यायाधीशांनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या खटल्यासाठी आधीच तारीख निश्चित करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे खन्ना यांनी रणवीरच्या लीगल टीमला अधिक माहितीसाठी न्यायालयाच्या रजिस्ट्रीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
समय रैनाच्या शोमध्ये रणवीरने आईवडिलांबद्दल विचारलेल्या अश्लील प्रश्नावरून देशभरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. याविरोधात गुवाहाटीच्या एका रहिवाशाने औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर आसाम पोलिसांनी अश्लीलता आणि सार्वजनिक नैतिकतेशी संबंधित कलमांखाली रणवीरविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणात रणवीरसह समय रैना, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखिजा यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलंय.
आसाम पोलिसांचं पथक सध्या रणवीर, समय रैना आणि इतरांना समन्स बजावण्यासाठी मुंबईत आहे. समय रैनालाही चार दिवसांत आसाम पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र समय त्याच्या शोनिमित्त परदेशात असल्याने चौकशीला हजर राहण्यासाठी त्याने अतिरिक्त वेळ मागितला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List