गुलालाच्या उधळणीत भक्तांचा जल्लोष अन् ‘चांगभलं’चा गजर ! श्री काळभैरव पालखी सोहळा जल्लोषात
गुलालाची मुक्त उधळण अन् ढोल-ताशांच्या निनादावर भक्तांचा जल्लोष याबरोबरच ‘भैरीच्या नावानं चांगभलं’चा गजर… अशा भक्तिमय वातावरणात सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा आज सायंकाळी अलोट गर्दी आणि जल्लोषात पार पडला. मिरवणुकीने पालखी डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. उद्या (शुक्रवार, दि. 14) यात्रेचा मुख्य दिवस आहे.
गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील श्री काळभैरव मंदिरात पुजारी, मानकरी, प्रशासकीय अधिकारी व असंख्य भक्तांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणूक सुरू झाली. आकर्षक फुलांनी पालखी सजविण्यात आली होती. पालखीसमोरील सासनकाठ्यांना गोंडे बांधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या गोंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री काळभैरवाच्या भक्तीत तल्लीन होऊन गुलालाच्या उधळणीत आबालवृद्धांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. पालखी शिवाजी चौकातून, नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोडवरून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. रात्री बारा वाजता श्री काळभैरव देवाची शासकीय पूजा झाली. पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
आज यात्रेचा मुख्य दिवस
■ शुक्रवार (दि. 14) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागातून लाखो भाविक गर्दी करतात. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. यात्रास्थळी जाण्यासाठी गडहिंग्लज आगाराने जादा बस गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. प्रशासनाबरोबरच विविध पक्ष संघटनांनीदेखील भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सज्ज आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List