महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक; 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, दोन जवान शहीद
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. या चकमकीमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमकीदरम्यान दोन जवान शहीद झाले असून दोन जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तर पोलिसांनी दिली. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात येणाऱ्या जंगलात रविवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू असताना ही चकमक उडाली. या चकमकीमध्ये 12 नक्षलवादी ठार झाले, तर चार जवान गंभीर जखमी झाले होते. जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे बस्तर पोलिसांनी सांगितले. चकमक उडाली त्या ठिकाणाहून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Chhattisgarh: 2 jawans lost their lives, 2 injured in an encounter with Naxalites in the forests under the National Park area of District Bijapur. Search operation is going on: Bastar Police
12 Naxalites have also been killed in the encounter https://t.co/6M8Z5sLzkv pic.twitter.com/QJXrM8W9k3
— ANI (@ANI) February 9, 2025
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. डीआरजी बिजापूर, एसटीएफ आणि सी-60 तुकडीचे जवान नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवत आहेत. बिजापूरमध्येच 1 फेब्रुवारी रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात 8 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले होते. गेल्या महिन्यात 20-21 जानेवारी रोजीही छत्तीसगड-ओडिशा सीमावरील जंगलात उडालेल्या चमकीत 16 नक्षलवादी ठार झाले होते. याच चकमकीत 90 लाखांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी चलपतीही ठार झाला होता.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत छत्तीसगडमधील विविध भागात झालेल्या चकमकीत 50 हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List