कुदळवाडीत अतिक्रमण कारवाईचा धडाका , 42 एकरमधील 222 बांधकामांवर हातोडा
चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि. 8) पहाटेपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. शनिवारी दिवसभरात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल 42 एकरमधील 18 लाख 36 हजार 532 चौरस फुटांवरील 222 बांधकामांवर कारवाई केली. कारवाईविरोधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसेच या भागातील इंटरनेट सेवा बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला सूचनादेखील केल्या. या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अजिंक्य येळे, किशोर ननवरे आदी अधिकारी सहभागी झाले होते.
या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील 4 कार्यकारी अभियंते, 16 उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 180 जवान, 600 पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. 16 पोकलेन, 8 जेसीबी, 1 क्रेन आणि 4 कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय 3 अग्निशमन वाहने आणि 2 रुग्णवाहिकादेखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.
अनधिकृत उद्योग, भंगार गोदाममुळे वायू प्रदूषण वाढत आहे. कुदळवाडीतील नाल्यातून उद्योगाचे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. या भागात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाची कोणतीही मान्यता घेतली जात नाही. अनधिकृतपणे गोदामे, उद्योग सुरू होते. दीड महिन्यांपूर्वी अनधिकृत व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या. शहरातील ज्या भागात अनधिकृत गोदामे असतील, तिथेही टप्याटप्याने कारवाई केली जाणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List