माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार मंडईची दुरुस्ती तातडीने करा! शिवसेनेची मागणी, धोकादायक पत्रे, कोबा उखडला, व्यापाऱ्यांचे नुकसान
दादर येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार मंडईमध्ये धोकादायक पत्रे, उखडलेला कोबा अशा समस्यांमुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार महेश सावंत यांनी शिष्टमंडळासह बाजार विभाग सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक घेऊन माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार मंडईची दुरुस्ती तातडीने करा, अशी मागणी केली.
दादर येथील हे फुल मार्पेट 9 जुलै 1998 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील मंडई येथून सेनापती बापट मार्गावर कामगार क्रीडा भवनजवळील पालिकेच्या जागेत कायमस्वरूपी स्थलांतरीत केले आहे. या मार्केटमध्ये दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असताना केवळ पावसाळी कामे करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर या फुल बाजारातील व्यापाऱ्यांनी आमदार महेश सावंत यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यानंतर आमदार महेश सावंत यांनी बाजार सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक घेऊन या ठिकाणची दुरुस्ती करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, व्यापारी मंडळाचे उपाध्यक्ष मनोज पुंडे, हरिदास मांजर्डेकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
मंडईच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पत्रे मोडकळीस आले आहेत. शिवाय तुळशी वृंदावनावरील पत्रे धोकादायक अवस्थेत आहेत. हे पत्रे कोसळल्यास जीवित-वित्तहानी होण्याचा मोठा धोका आहे. असे घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल यावेळी करण्यात आला. उंदरांमुळे फुल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. मंडईच्या गल्ली क्र. 4 च्या वरील बाजूस पत्रे न लावल्याने फुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून लवकरात लवकर ही कामे करावीत, असे निर्देशही यावेळी पालिका प्रशासनाला देण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List