वा रे भाजपचे हिंदुत्व! मराठी माणसाच्या हळदीकुंकू आणि सत्यनारायण पूजेला विरोध, डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद
धूप लावण्याच्या किरकोळ वादातून मंत्रालयातील अमराठी अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची कल्याणमधील घटना ताजी असतानाच आज पुन्हा डोंबिवलीतील एका सोसायटीत अमराठी रहिवाशांनी मराठी कुटुंबांवर जुलूमशाही केली. सत्यनारायण पूजा आणि हळदीकुंकूला विरोध करत साईकमल छाया या सोसायटीतील मराठीद्वेष्टय़ांनी धुडगूस घालत महिला आणि मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले. भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर परप्रांतीयांची मराठी कुटुंबांवरील मुजोरी वाढली असून वा रे व्वा… हेच का भाजपचे हिंदुत्व, असा संतप्त सवाल कल्याण-डोंबिवलीकर करीत आहेत.
डोंबिवलीच्या नांदिवलीमध्ये साईकमल छाया या इमारतीत 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण व हळदीपुंकू समारंभ होणार आहे. सोसायटीतील रहिवाशांनी या धार्मिक उत्सवाची तयारी सुरू केली आहे. सोसायटीच्या नोटीस बोर्डवर याबाबतच्या कार्यक्रमांची माहिती लिहिली आहे. मात्र काही मराठीद्वेष्टय़ा परप्रांतीय रहिवाशांनी या फलकाचा फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला आणि सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. हा मेसेज सर्वत्र व्हायरल होताच रहिवाशांनी सोमवारी रात्री हा मेसेज व्हायरल करणाऱया अनिल भट आणि चिराग लालन या रहिवाशांना जाब विचारला.
हळदीकुंकू आणि पूजा हवीच कशाला?
मुजोर भट आणि लालन याने दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पूजा आणि हळदीकुंकू हवेच कशाला अशी उद्धट भाषा वापरली. यावेळी मराठी भाषेचा अवमान करत त्यांनी महिलांना शिवीगाळ केली. यानंतर सोसायटीत मोठा गोंधळ उडाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भाषिक तेढ निर्माण केल्याबद्दल अनिल भट आणि चिराग लालनविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली.
संत साहित्याविषयी शेरेबाजी
सोसायटीत सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. मात्र अनिल भट आणि चिराग लालन यासारखे काही मराठीद्वेष्टे मुद्दामहून वाद घालत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सत्यनारायण पूजा आणि हळदीकुंकूविषयी या दोघांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची तोडफोड करून आक्षेपार्ह शेरेबाजी केली. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचा भडका उडाला. मायमराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा अनघा परब, योगिता गायकवाड यांच्यासह अन्य महिलांनी दिला.
परप्रांतीय तरुणाने विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घातली
डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद उफाळून आला असतानाच कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादातून मराठी विद्यार्थ्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये श्लोक सावंत हा विद्यार्थी थोडक्यात बचावला असून मुजोर सुयश तिवारीविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्लोक कल्याण पूर्व लोकग्राम परिसरात राहत असून तो बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दुपारी श्लोक कॉलेजहून घरी येत होता. यावेळी सुयश आणि त्याच्या गुंड मित्रांनी थार गाडीतून त्याचा पाठलाग केला. श्लोक घराच्या परिसरात दुचाकीवरून उतरला असता सुयशने थार गाडीने श्लोकला चिरडण्याचा प्रयत्न केला. यातून तो थोडक्यात बचावला. यानंतर सर्वांनी त्याला मारहाण केली. त्याचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र श्लोकने आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी श्लोकची आई जुही सावंत यांनी घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित नाही, बाहेरून येऊन दादागिरी करणाऱयांना संरक्षण दिले जाते, असा आरोप केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List