स्थानिकांना मिळणार विठुरायाचे शॉर्टकट दर्शन, नवं दाम्पत्य, वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था; मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय
अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत मंदिर समितीने स्थानिकांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाची वेळ वाढवली असून आता रात्री देखील दर्शनास सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. माघी वारीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाबाबत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची नवीन भक्तनिवास येथे बैठक पार पडली. या बैठकीला सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी महाराज मोरे, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी वेगळी व्यवस्था आहे. मात्र यासाठी पहाटे 6 ते 6.30 असा केवळ अर्धा तासाचा कालावधी होता. या काळात येणार्या स्थांनिकांना आधारकार्ड दाखवून रांगेमधून सोडले जात होते. मात्र याची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत मंदिर समितीने आता पहाटे 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत स्थानिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासह रात्री 10.30 ते 11 यावेळेतही स्थानिकांना दर्शन घेता येणार आहे. तर दिव्यांग, वयोवृध्द, आजारी, गर्भवती महिलांना, नव वधू-वर आदींना झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन औसेकर महाराज यांनी केले.
गेल्या महिन्यात श्रींच्या दर्शन रांगेत दोन भाविकांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. अशा मृत भाविकांच्या नातेवाईकांना मंदिर समिती एक लाख रूपये मदत देणार असून ते मृतदेह त्यांच्या गावात पाठविण्याची सोय देखील करणार आहे. मंदिर समितीने स्वच्छतेचा ठेका दिला असून या अंतर्गत मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागेच्या वाळवंटाचा काही भाग स्वच्छ केला जातो. मात्र वाळवंटाची स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पंढरपूर नगरपरिषद व मंदिर समिती एक दिवसाआड स्वच्छता करण्याबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
मंदिर परिसरात महिलांसाठी बाथरूम नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने यावर देखील तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. बैठकीमध्ये माघी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दर्शन काहीवेळ बंद ठेवले जाणार
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असून यामुळे मंदिरातील काही भाग भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच श्री विठ्ठलाचे मुखदर्शन देखील लांबून ठेवण्यात आले आहे. याबाबत कॉंग्रेसचे दत्तात्रय बडवे यांनी मुखदर्शनाचे अंतर कमी करावे अशी मागणी केली आहे. याबाबत औसेकर महाराज म्हणाले की, दोन्ही देवाचे गाभारे, सोळखांबी, चौखांबी येथील दगडांना कोटींग करणे तसेच जमिनीवरील दगड सपाट करणे आदी महत्वपूर्ण काम बाकी आहे. दगडांना कोटींग केल्यावर ते वाळण्यास आठ तास लागतात तर त्याचा वास बारा तासा पर्यंत राहतो. यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार दर्शन बंद ठेवण्याची मागणी करीत आहेत. मात्र, मंदिर समितीने दर्शन बंद न ठेवता दर्शनाची वेळ कमी करावी का यावर चर्चा केली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शन सुरू ठेवून त्यानंतर ते बंद ठेवत राहिलेले काम करावे असा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List