बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बस घेणे बंद करा, अन्यथा जोरदार आंदोलन!
‘बेस्ट’मध्ये भाडेतत्त्वावरील बस घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांचा फायदा करून देण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जिवाशी खेळ होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. शिवाय आधीच आर्थिक खड्डय़ात गेलेल्या बेस्टमध्ये भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळत आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’मध्ये भाडेतत्त्वावर बस घेणे बंद करा, याबाबत 16 डिसेंबरपासून ठोस निर्णय घ्या, अन्यथा शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज बेस्ट कामगार सेनेकडून अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला.
बेस्टमध्ये 2019 पासून भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय झाला. यावेळी बेस्ट उपक्रम आणि तत्कालीन बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये करार झाला. यानुसार बेस्टच्या स्वमालकीच्या गाडय़ांचा ताफा किमान 3337 ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र या करारानुसार बेस्ट स्वमालकीच्या गाडय़ांचा ताफा राखण्यात अयशस्वी झाल्याचे सुहास सामंत यांनी वडाळा येथे बेस्ट कामगार सेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी बेस्ट समिती सदस्य रंजन चौधरी उपस्थित होते.
अपघाताला आयुक्तांपासून अधिकारीही जबाबदार
भाडेतत्त्वावरील बसच्या ड्रायव्हरना सुमारे 50 हजार रुपये पगार मिळत असताना पंत्राटी चालक-वाहकांना केवळ 15 ते 16 हजार रुपये पगार मिळतो. कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना बोनस, रजेचा पगार पिंवा कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी खासगी वाहनांवर डय़ुटी केल्यानंतर बेस्टच्या डय़ुटीवर येतात. याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. असे असताना अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांना एका फेरीचे पाच हजार मिळवून देण्यासाठी नादुरुस्त गाडय़ाडी आगाराबाहेर काढण्याचे आदेश दिले जातात. अधिकारी कंत्राटदारांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कुर्ल्यासारखे अपघात घडतात. त्यामुळे या अपघाताला पालिका आयुक्तांपासून सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करा, अशी मागणीही सामंत यांनी केली.
स्वमालकीच्या बस का घेत नाही?
बेस्टला स्वमालकीच्या गाडय़ा घेण्यासाठी 75 टक्के अनुदान, राज्य सरकार 10 टक्के तर महापालिका 5 टक्के अनुदान देण्याचे निश्चित होते. असे असताना बेस्ट प्रशासन स्वमालकीच्या गाड्या का घेत नाही, असा सवालही सुहास सामंत यांनी यावेळी केला. आर्थिक अडचणीत असणारी बेस्ट वाचवण्यासाठी वारंवार वेळ मागूनही भेट न देणारे आयुक्तही बेस्टच्या दुरवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोपही सामंत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List