Zakir Hussain: झाकीर हुसेन यांची फिल्मी लव्हस्टोरी; कुटुंबीयांच्या नकळत गुपचूप उरकलं होतं लग्न
प्रसिद्ध तबलावादक पंडित झाकीर हुसेन यांचं हृदयाशी संबंधित आजारामुळे सॅन फ्रॅन्सिस्को इथल्या रुग्णालयात निधन झालं. 73 वर्षीय झाकीर हुसेन हे अमेरिकेमध्ये स्थायिक होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांकडूनच तबल्याचं बाळकडू मिळालेल्या झाकीर यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ संगीतकार, नर्तकांबरोबर आंतरराष्ट्रीय दौरे केले आणि त्यांना मोठं यशही मिळालं. झाकीर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी अनेकांना माहिती असली तरी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
झाकीर हुसेन यांची प्रेमकहाणी
झाकीर हुसेन यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना न सांगताच गुपचूप लग्न उरकलं होतं. आमचं लग्न हे एक गुपित होतं, ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती, असं ते म्हणाले होते. नंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना याविषयी समजलं तेव्हा परंपरेनुसार त्यांचं लग्न पार पडलं. झाकीर यांच्या आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. परंतु नंतर त्यांनी अँटोनियाला सुनेच्या रुपात स्वीकारलं होतं.
झाकीर हुसेन यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कॅलिफोर्नियातून झाली. तिथे ते तबल्याचं ज्ञान शिकायला गेले होते. तबल्याचं प्रशिक्षण घेता घेता एका परदेशी तरुणीवर त्यांचं प्रेम जडलं. ही घटना 70 व्या दशकातील आहे. कॅलिफोर्नियातील बे एरियामध्ये ते एका इटालियन-अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडले होते. अँटोनिया मिनेकोला असं तिचं नाव होतं. अँटोनियाला पाहताच क्षणी झाकीर त्यांच्या प्रेमात पडले होते.
झाकीर आणि अँटोनिया यांच्या ओळखीनंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सुरुवातीला झाकीर यांनी अँटोनियासोबतचं त्यांचं नातं कुटुंबीयांपासून लपवलं होतं. इतकंच नव्हे तर दोघांनी गुपचूप लग्नसुद्धा उरकलं होतं. झाकीर आणि अँटोनिया यांनी 1978 मध्ये लग्न केलं. या दोघांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधामुळे त्यांनी हे पाऊल उचललं होतं. झाकीर यांच्या आईला अँटोनियासोबतचं त्यांचं नातं मान्य नव्हतं. मात्र दोघांच्या लग्नाविषयी जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी औपचारिकरित्या लग्न केलं.
झाकीर आणि अँटोनिया यांनी आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. अभिनेत्री सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत झाकीर यांनी खुलासा केला होता, आपल्या जातीबाहेर लग्न करणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिलेच सदस्य होते. म्हणून त्यांच्या आईने अँटोनिया यांच्यासोबतच्या लग्नाला परवानगी नाकारली होती. मात्र झाकीर यांच्या वडिलांनी त्यांना गुपचूप लग्न करण्यास मदत केली होती. नंतर त्यांनी आईला लग्नाविषयी सांगितलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List