Winter Session: राज्य जळत होतं तेव्हा हे सरकार उत्सव साजरं करत होतं; नितीन राऊत यांचा महायुतीवर निशाणा
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. यावेळी विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक दिसत असून राज्यात वाढती गुन्हेगारी, महायुतीचे हिंदुत्त्वावरील बेगडीप्रेम आणि बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणार आहे. याआधी बोलताना काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.
राज्यात एका सरपंचाची हत्या झाली, परभणी जळत होतं तेव्हा हे सरकार उत्सव साजरा करत होतं, असा आरोप करत नितीन राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. आज विदर्भात हे अधिवेशन होतंय. विधानसभेचा आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे, असं नितीन राऊत म्हणाले.
‘एका सरपंचाची हत्या होते, या राज्यामध्ये परभणी जळत आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. या सर्व घटनांवर जाब विचारण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत’, असं राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत यांनी परभणीतील घटनेवरून सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं. ‘महत्वाचा प्रश्न आहे की त्या परभणीमध्ये पोलिसांनी जोरजबरीनं घराघरांमध्ये घुसून, निवडून निवडून बायका आणि मुलांना ज्या पद्धतीने बेदम मारलं त्या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवून जो दरारा पसरवण्याचा दडपशाही करण्याचं काम केलं त्याची चौकशी कोण करणार आहे? त्याला काय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते का? त्यांनी घरात घुसून भीमसैनिकांना मारायचं महिलांना मारायचं? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या व्हिडिओ क्लिप्स मी आज सभागृहात सादर करणार आहे, असंही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List