लग्नानंतर माधुरीने का सोडली इंडस्ट्री? 25 वर्षांनंतर पश्चात्ताप? म्हणाली “माझी मुलं..”
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यासाठी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. 1999 मध्ये लग्नानंतर ती पती नेनेंसोबत कोलोरॅडोला राहायला गेली. ग्लॅमर आणि झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर हे दोघं परदेशात अनेक वर्षे राहिले. 2011 मध्ये त्यांनी त्यांच्या आरिन आणि रायन या दोन मुलांसह भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. माधुरी नुकतीच ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानिमित्त दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत ती लग्नानंतर देश आणि फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, “मी खूप खुश होते, कारण माझ्यासाठी हा सगळा लवाजमा महत्त्वाचा नव्हता. मी जे करायची ते मला आवडत होतं. मला अभिनय, नृत्य आणि माझ्या करिअरमध्ये जे काही केलं, ते सर्व आवडत होतं. माझा त्या सगळ्यात खूप रस होता. त्यासोबत मिळणाऱ्या इतर गोष्टी या केवळ मी बोनस म्हणून पाहते. लोक मला स्टार समजतात, हे माझ्यासाठी बोनस आहे. पण मी स्वत:कडे कधीच त्या दृष्टीने पाहत नाही. त्यामुळे माझ्यासाठी असं कधीच नव्हतं की, अरे देवा.. मी आता प्रकाशझोतात नसेन. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न करतेय. मी कधीच अशा दृष्टीने विचार केला नाही.”
“मी फक्त एवढाच विचार केला की मी योग्य व्यक्तीला भेटले. मला नेनेंसारख्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं आणि त्यांच्याशी मी लग्न केलं कारण प्रत्येकाचं स्वत:साठी असं स्वप्न असतं. माझंही हेच स्वप्न होतं की माझं घर असावं, पती असावा, कुटुंब आणि मुलंबाळं असावीत. मला लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे माझी मुलं ही माझ्या स्वप्नाचा खूप मोठा भाग आहेत. जेव्हा लोक म्हणतात की अरे तू इंडस्ट्रीपासून दूर गेलीस आणि तुला इथली आठवण आली नाही का? मला हेच म्हणायचं आहे की, नाही.. मला इथली आठवण आली नाही कारण मी माझं स्वप्न जगत होती”, असं ती पुढे म्हणाली.
1993 ते 2013 या काळात माधुरीने ‘पुकार’, ‘गजगामिनी’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘लज्जा’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘देवदास’, ‘आजा नचले’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ती रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील एका गाण्यात झळकली. माधुरीने ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातही भूमिका साकारली. याशिवाय विविध रिॲलिटी शोजमध्ये ती परीक्षक म्हणून उपस्थित होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List