दिल्ली डायरी – हरियाणाचा ‘लाल’ कोण होणार?

दिल्ली डायरी – हरियाणाचा ‘लाल’ कोण होणार?

>> नीलेश कुलकर्णी  

हरियाणा विधानसभा निवडणुकीत जनता भाजपला साथ देऊन भाजपची नय्या पार करणार की काँग्रेसला कौल देणार, याबाबत उत्कंठा आहे. देवीलाल, बन्सीलाल, भजनलाल या तीनलालांभोवती हरियाणाचे राजकारण फिरायचे. आता हे तिघेही हयात नाहीत. राजकारणात नवी पाती व नवी नाती तयार झाली आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणाचालालकोण होणार? हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.

हरियाणाची यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘खिचडी मित्र’ मनोहरलाल खट्टर कोणताही राजकीय वकूब व अनुभव नसताना तब्बल नऊ वर्षे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. मात्र खट्टर अगदीच तुचकामी ठरत आहेत, हे लक्षात आल्यानंतर भाजपने नेतृत्व बदल करत माळी समाजाच्या नायब सैनी यांना मुख्यमंत्रीपदी आरूढ करून ओबीसी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राजकारण हे परंपरागत जाट, दलित व मुस्लिमांवर आधारलेले आहे. काँग्रेसची सत्ता आली तर माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा हे मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित आहे. असे असले तरी निवडणूक होण्यापूर्वीच काँग्रेस नेते ‘हमारी ही सरकार बनेगी’, अशा आत्मविश्वासात वावरताना दिसतात. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मुकाबला भाजप व काँग्रेसमध्येच असला तरी, ओमप्रकाश चौटाला व त्यांचे नातू दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचा प्रभावही तितकाच महत्त्वाचा असेल. या दोन्ही पक्षांनी मिळून काँग्रेसच्या जाट व्होटबँकेला सुरुंग लावला तर काँग्रेसला दहा वर्षांनंतरही सत्ता मिळविणे अवघड राहील. ‘आयाराम गयाराम’ राजकारणाचे प्रतीक असेलल्या हरियाणात एकेक आमदाराची ‘किंमत’ मोठी आहे आणि दिल्लीतील महाशक्ती वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. त्यामुळे काँग्रेसने सावध असलेले बरे!

कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्याने हरियाणाची निवडणूक ‘ग्लॅमरस’ झालेली असली तरी या कुस्तीपटूंचे ग्लॅमर काँग्रेसला सत्तेची झळाळी मिळवून देईल काय? हा कळीचा प्रश्न आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हरियाणा अगदी छोटे राज्य आहे. मतांच्या टक्केवारीचा थोडा जरी स्विंग इकडे तिकडे झाला तरी सत्तेची गणिते बदलू शकतात. भाजपने सुरुवातीला खट्टर व नंतर सैनींच्या रूपाने बिगर जाट समाजाचे मुख्यमंत्री बसवल्याने नाही म्हटले तरी बिगर जाटांमध्ये भाजपबद्दल फिलगुडचे वातावरण आहे. त्यातच दिल्लीच्या वेशीवर झालेले शेतकरी आंदोलन, त्यात जाट नेत्यांचे सक्रिय असणे, हे सगळेच मुद्दे लक्षात घेतले तर या वेळची निवडणूकही जाट विरुद्ध बिगर जाट अशीच होईल. भाजप व काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आली आहे. त्यात भाजपसारख्या स्वयंघोषित शिस्तबद्ध पक्षात तिकिटांसाठी कपडे फाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस अगदी सहजपणे निवडणूक जिंकेल, असे सुरुवातीचे वातावरण होते. मात्र काँग्रेसमध्ये हुड्डा विरुद्ध रणदीप सुरजेवाला, सेलजा यांच्यातील शीतयुद्ध, चौटालांचे पक्ष रिंगणात असणे या बाबी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणाऱ्या आहेत. निवडणुकीच्या दरम्यानच चौटाला परिवार पुन्हा एकत्र येईल, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र हे घडले आणि नाही घडले तरी एकमेकांच्या सामंजस्याने हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवतील. जाट बेल्टमध्ये त्यामुळे काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लागू शकतो. चौटालांचा परिवार एकत्र आला तर, मायावतींचा बसपा व आजाद पक्ष काय करणार हेही महत्त्वाचे असेल. काँग्रेसला आणखी एक धोका आहे तो आम आदमी पक्षाचा. दिल्ली व पंजाबप्रमाणे हरियाणात ‘आप’ची फारशी ताकद नसली तरी काँग्रेसला फटका देण्याइतपत आम आदमी पक्षाचे नेटवर्क आहे. ‘आप’ हरियाणात स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे, त्याचाही फटका बसू शकतो.

बृजभूषण ‘‘आऊट ऑफ कंट्रोल

घर फिरले की घराचे वासे कसे फिरतात’ याचा प्रत्यय सध्या दिल्लीतील महाशक्ती घेत आहे. महिला कुस्तिगीरांचे शोषण केल्याचा आरोप असलेले पैलवान बृजभूषण शरणसिंग हे सध्या महाशक्तीला आपल्या तालावर नाचवत आहेत. शोषणाचे आरोप झाल्यामुळे बृजभूषण यांचे लोकसभेचे तिकीट कापावे लागले. बृजभूषण यांनी आपले बाहुबली चिरंजीव करणसिंग यांना खासदार बनवले. दुसरीकडे त्यांचे खासमखास संजय सिंग यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनवले. मात्र एवढे सगळे मनासारखे घडूनही बृजभूषण समाधानी नाहीत. महिला कुस्तीपटू व हरियाणातल्या पैलवानांविरोधात बृजभूषण यांचे गरळ ओकणे सुरूच आहे. ‘ज्या पद्धतीने पांडवांनी महाभारतात द्रौपदीला पणाला लावले होते त्याप्रमाणे काँग्रेसने कुस्तीपटूंना पणाला लावले,’ असे विधान करून बृजभूषण यांनी नवा वाद निर्माण केला. त्यामुळे खडसावणीच्या सुरात भाजपाध्यक्ष नड्डा यांनी बृजभूषण यांना फोन करून, ‘आप चुप रहिये. ऐसे विधान करने से बचिये,’ असा सल्ला दिला. बृजभूषण यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हरियाणात विनेश फोगाटबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ती मते काँग्रेसकडे जातील, अशी भीती महाशक्तीला आहे तर दुसरीकडे हुड्डा सरकार सत्तेवर आले व विनेश फोगाट सत्तेत आली तर, आपल्या कुस्ती महासंघातील वर्चस्वाला धक्का बसेल, ही भीती बृजभूषण यांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांचा तोल ढासळला आहे.

जम्मूकश्मीरमध्ये अपक्षांनाअच्छे दिन

जम्मूकश्मीरमध्ये सध्या अपक्षांना अच्छे दिन आले आहेत! कश्मिरी पंडितांना अच्छे दिन येण्याऐवजी हे भाग्य अपक्षांच्या नशिबी आले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. अनेक वर्षांनंतर राजकीय संधी प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा अनेकांच्या मनात आहे. त्यातूनच तिकीट मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तब्बल 44 टक्के अपक्षांनी रणांगणात उडी मारली आहे. अर्थात या अपक्षांचे प्रेरणास्थान बनला आहे तो पुख्यात खासदार राशिद इंजिनीअर. राशिद आयएसआयशी संबंध असल्याच्या तसेच हत्यारांची तस्करी केल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते. निवडणुकीच्या तोंडावर ते अंतरिम जामीनावर बाहेर आले आहेत. तुरुंगातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभूत केले होते. त्यामुळे आपल्यालाही राशिदसारखी ‘लॉटरी’ लागू शकते, या भरवशावर अनेकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली आहे. या पुख्यात राशिदना सध्या भाजपने ‘पवित्र’ करून घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अपक्ष उतरवून काँगेस, पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्सच्या मुस्लिम व्होटबँकेत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान आहे. अपक्ष उमेदवार हे भाजपचे ‘प्रॉक्सी उमेदवार’ आहेत, असा प्रचार या पक्षांना करावा लागत आहे. काही ठिकाणी विशेषतः दक्षिण कश्मीरमध्ये या अपक्षांना जमात ए इस्लामीचे समर्थन असल्याने काँग्रेसपुढची आव्हाने अधिकच वाढताना दिसत आहेत. या भरमसाट अपक्षांपैकी किती टक्के अपक्ष विधानसभेत पोहचतात ते दिसेलच!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय… Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय…
maharashtra cabinet meeting decision today: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची सोमवारी झाली. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे...
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, वेगही मंदावणार; कारण….
राज्यात विशेष शिक्षकांची जम्बो भरती, होमगार्डचा भत्ताही वाढला; कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय काय?
मृणाल ठाकूरने ‘या’ चित्रपटातील भूमिकेसाठी पटकावला करिअरमधील पहिला IIFA पुरस्कार
Rekha: नवऱ्याने स्वतःचा जीव संपवल्यानंतर अशी होती रेखा यांची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाल्या…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पुरस्कार सोहळ्यात…
घटस्फोटानंतर मुलासोबत वणवण भटकतेय अभिनेत्री; विकलं 9 वर्षे जुनं घर