कठुआमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, राजौरीतही चकमक सुरू

कठुआमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, राजौरीतही चकमक सुरू

कठुआ जिह्यातील कोग मांडली दुर्गम गावात सुरू असलेल्या चकमकीत दुसऱया दिवशी रविवारी आणखी एका दहशतवाद्याला टिपण्यात आल्यामुळे या चकमकीत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. राजौरीच्या थानामंडी भागातही रविवारी संध्याकाळी चकमकीला तोंड फुटले आहे.

कोग मंडली भागात चकमक सुरू असलेल्या ठिकाणी आज या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. शनिवारी या चकमकीत हेडकॉन्स्टेबल बशीर अहमद शहीद झाले होते. तर, पोलीस उपअधीक्षक आणि सहायक निरीक्षक जखमी झाले होते. गावात दुसऱया दिवशीही सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू होती.

राजौरीतही चकमक

राजौरी जिह्याच्या थानामंडी भागातील मनिआल गली येथे दोन दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी येथे घेराव घालून संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. येथेही दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

तीन ते चार परदेशी दहशतवादी

जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, या भागात तीन ते चार परदेशी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी गावात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या संयुक्त सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात हेडकॉन्स्टेबल बशीर अहमद शहीद झाले. या वेळी जखमी झालेल्या दोन अधिकाऱयांची प्रकृती स्थीर आहे. बशीर अहमद यांनी अंतिम श्वास जाईपर्यंत त्यांच्या मशिनगनमधून गोळीबार सुरू ठेवल्यामुळे दहशतवाद्यांना पळ काढणे अशक्य झाले होते.

तिसऱया टप्प्यातील मतदान उद्या

दरम्यान, लागोपाठ दहशतवादी हल्ले, चकमकी आणि सैनिकांचे मृत्यू यांना सामोऱया जाणाऱया जम्मूमध्ये मंगळवारी तिसऱया आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आज या टप्प्यासाठी सुरू असलेला प्रचार संपुष्टात आला. कठुआसह, तिसऱया टप्प्यात जम्मू विभागातील जम्मू, उधमपूर आणि सांबा जिल्हे आणि उत्तर कश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिह्यांत मतदान होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List