तुम्ही शाहरुखच्या पत्नीलाही हेच विचाराल का? मुलाखतीत भडकली गोविंदाची पत्नी
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. जेव्हा रिॲलिटी शोजचा विषय आला, तेव्हा सुनिताने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. करणकडून शोच्या आमंत्रणाची प्रतीक्षा करत असल्याचंही तिने म्हटलंय. मात्र जेव्हा बिग बॉसचा उल्लेख झाला, तेव्हा तिने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या मी सक्षम असून मला अशा शोमध्ये स्पर्धक म्हणून जाण्याची काही गरज नाही, अशा शब्दांत तिने उत्तर दिलं. त्याचप्रमाणे बिग बॉसकडून अनेकदा ऑफर्ससुद्धा आल्याचा खुलासा सुनिताने या मुलाखतीत केला.
कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये जायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता सुनिता म्हणाली, “मी खरंतर या शोच्या आमंत्रणाची प्रतीक्षा करतेय.” करणने या शोमध्ये अद्याप बोलवलं नसल्याचा राग मनात आहे का असं विचारलं असता सुनिता पुढे म्हणाली, “मी कशाला रागवेन? हा त्याचा शो आहे. त्यामुळे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे तोच ठरवेल. पण जर त्याने मला बोलावलं, तर त्याच्या शोची रेटिंग मात्र नक्कीच वाढू शकेल. करण आणि माझं चांगलं जमेल असं मला वाटतं.”
बिग बॉसमध्ये जायला आवडेल का, या प्रश्नावर उत्तर देताना सुनिता म्हणाली, “मला गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याकडून ऑफर्स येत आहेत. अनिल कपूर यांनी सूत्रसंचालन केलेल्या ओटीटी व्हर्जनसाठीही विचारणा झाली होती. त्या सिझनसाठी ते माझ्याकडे दोन वेळा आले होते. पण मी त्यांना स्पष्टच म्हटलं की, तुम्ही वेडे झालात का? मी तुम्हाला टॉयलेट क्लीन करणारी वाटते का? तुम्ही मला हा प्रश्न विचारताय, पण तुम्ही शाहरुख खानच्या पत्नीला हेच विचाराल का? आम्हाला काही आर्थिक समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? मी तर बिग बॉस बघतसुद्धा नाही.”
बिग बॉसच्या निर्मात्यांनी केवळ मलाच नाही तर माझी मुलगी टीनालाही ऑफर दिली होती, असाही खुलासा सुनिता यांनी या मुलाखतीत केला. “तुम्ही कोणाशी बोलत आहात, हे तरी तुम्हाला कळतंय का? जर तुम्हाला सलमान खानसोबत अजून कोणी सूत्रसंचालनासाठी हवं असेल तर तेव्हा माझ्याकडे या”, असं उत्तर निर्मात्यांना दिल्याचं सुनिता यांनी सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List