मंगलमूर्ती – चंद्रकांता गणपती

मंगलमूर्ती – चंद्रकांता गणपती

>>डॉ. सुनीलकुमार सरनाईक

सुमारे 150 वर्षे वय असलेला कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील सरदेसाई यांचा ‘चंद्रकांता गणपती’. डोक्यावर किरीट नसलेला, कुरळ्या केसांचा, छान मधोमध भांग पाडलेला, डोईवरचे देखणे कुरळे केस मधूनच चेहऱ्यावर लडिवाळपणे झेपावत असलेला, उजवा पाय खाली सोडून डावा पाय सिंहासनावर दुडपून त्यावर डावा हात ठेवलेला, मोठय़ा ऐटीत लोडाला टेकून बसलेला असा आगळावेगळा गणपती जुन्या पिढीतील अनेकांच्या स्मरणात आजही आहे.

डोक्यावर किरीट नसलेला, कुरळ्या केसांचा, छान मधोमध भांग पाडलेला, डोईवरचे देखणे कुरळे केस मधूनच चेहऱयावर लडिवाळपणे झेपावत असलेला, उजवा पाय खाली सोडून डावा पाय सिंहासनावर दुडपून त्यावर डावा हात ठेवलेला, मोठय़ा ऐटीत लोडाला टेकून बसलेला असा आगळावेगळा गणपती आमच्या लहानपणी कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत आम्ही पाहत होतो. सुमारे 150 वर्षे वय असलेल्या या गणेशमूर्तीस सरदेसाई यांचा ‘चंद्रकांता गणपती’ असं म्हटलं जायचं. जुन्या पिढीतील अनेक जण या गणपतीविषयी भरभरून बोलतात. चंद्रकांता गणपती म्हटलं की, आजही जुन्या काळातील आठवणी ताज्या होतात.

ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली होती. यासारखी जुनी मूर्ती अन्यत्र कुठेही असल्याचे ऐकिवात नाही. या चंद्रकांता गणपतीबद्दल अनेक आख्यायिका त्या काळात कानावर यायच्या. आमच्या लहानपणी अशीच एक आख्यायिका सांगितली जायची की, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सलग 11 दिवस या चंद्रकांता गणपतीचे दर्शन घेतले की, हमखास परीक्षेत यश मिळते.त्यामुळे आम्ही गल्लीतल्या सवंगडय़ांना घेऊन 11 दिवस न चुकता या गणपतीचे दर्शन घ्यायचो. दुसरी आख्यायिका अशी की, गणेश चतुर्थी दिवशी चुकून चंद्रदर्शन झाले, तर 11 दिवस चंद्रकांता गणपतीचे दर्शन घेतले की, विघ्न टळते. कुमारीकेंना हमखास वरप्राप्ती करून देणारा आणि तरुणांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणूनही या चंद्रकांता गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी असायची.

बिनखांबी गणपतीकडून पश्चिमेला रंकाळ्याकडे निघालात की, वरुणतीर्थ वेशीला अर्धा शिवाजी पुतळा आहे, तिथून अगदी हाकेच्या अंतरावर दौलू मास्तरांच्या शाळेसमोर सरदेसाई यांचा वाडा होता. याच वाडय़ाच्या दर्शनी भागात चंद्रकांता गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. एका बाजूला रिद्धी, तर दुसऱया बाजूला सिद्धी अशा दोन्ही सुबक मूर्ती लक्ष वेधून घ्यायच्या. समोर मंडपात असंख्य काचेच्या रंगीबेरंगी हंडय़ा लावलेल्या असायच्या, तर गणपतीसमोर एका हंडीत पिवळाजर्द नाग असायचा. मूर्तीच्या सभोवताली मोठमोठय़ा आरशांची मांडणी अशा पद्धतीने केली होती की, त्यामध्ये मूर्तीच्या 21 प्रतिमा एकाच वेळी पाहता यायच्या. रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती इतक्या उठावदार व एकसारख्या होत्या की, इकडची तिकडे ठेवली तरी लक्षात येऊ नये.

चंद्रकांता गणपतीचे रूप पाहत रहावे असे होते. मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव, उठावदार व मोहक होती. 21 गणपती पाहण्यासाठी सगळीकडे हिंडण्याऐवजी सरदेसाईंच्या चंद्रकांता गणपतीच्या 21 प्रतिमा पाहून 21 गणपतींचं दर्शन घेऊन पुण्य मिळाल्याचं समाधान पदरी पाडून घेण्यासाठी करवीरवासीय त्याकाळी खूप गर्दी करीत असत.

सध्या या मूर्तीची स्थापना करणारे सरदेसाई यांच्यापैकी कोल्हापुरात कुणीही राहत नाही. या चंद्रकांता गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे 150 वर्षांपूर्वी वासुदेव वामन सरदेसाई व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी तत्कालीन नव्या बुधवार पेठेतील (पुढे शिवाजी पेठ असे नामांतर झाले) आपल्या वाडय़ात केली. हे सरदेसाई रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या घराण्यापैकीच. हे घराणे रत्नागिरी जिह्यातील मावळंगचे. कोकणातून नोकरीच्या निमित्ताने आलेले. सरदेसाई घराण्यात गणपतीची उपासना पूर्वीपासूनच चालत आलेली होती. गणपतीला कोकणात गावी जाण्यापेक्षा घरीच मूर्ती बसवावी, असा विचार करून त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार (कै.) बेंद्रे यांच्याकडचा शिल्पकार ही मूर्ती बनविण्यासाठी मुंबईहून खास आला होता. 21 प्रतिमा दिसतील अशा प्रकारची आरशांची रचना करण्यासाठी मुंबईतील एका अभियंत्याला पाचारण केले होते. आरसे व रंगीबेरंगी हंडय़ा बेल्जियमहून मागवल्या होत्या.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ही मूर्ती सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात येत असे. कोल्हापुरातील दूधगावकर वैद्य विधिवत पूजा-आरती करीत. अनंत चतुर्दशीपर्यंत ही मूर्ती सर्वांना पाहण्यासाठी खुली असे. (कै.) वासुदेव सरदेसाई यांची पुढची पिढी नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच परदेशी स्थायिक झाली. त्यांनी हा वाडा विकला तेव्हा या चंद्रकांता गणपतीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी (कै.) सखाराम बापू खराडे, (कै.) आनंदराव साळोखे, (कै.) जनार्दन सूर्यवंशी, (कै.) भिकशेठ पाटील, (कै.) हिंदूराव साळोखे यांनी शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने स्वीकारली आणि शिवाजी मंदिरात प्रतिष्ठापीत केली. मात्र पुढे या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा झाली नाही. दुर्दैव हे की, शिवाजी पेठेतील नव्हे तर संपूर्ण शहराचे आकर्षण असलेल्या या चंद्रकांता गणपतीची पुढे हेळसांड झाली. अलीकडे ही मूर्ती शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहातही दिसत नाही. सध्या मोहिते पार्क येथील (राधानगरी रोड) एकजुटी तरुण मंडळ येथे असल्याचे समजले. मात्र आजही गणेश चतुर्थी जवळ आली की, चंद्रकांता गणपतीविषयी आठवणी जाग्या होतात. शिवाजी पेठेतील जुनेजाणते लोक चंद्रकांता गणपतीविषयी आस्थेने आणि आत्मीयतेने बोलताना दिसतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी
नेपाळमध्ये शुक्रवारपासून पावसाने हाहाकार माजवला असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे 60 लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी...
IND Vs BAN – मुंबईचा पठ्ठ्या करणार टीम इंडियाचं सारथ्य, टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा
Ratnagiri News – महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील कर्दे गावाचा सर्वोकृष्ट कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मान
EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका
या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?
शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…
हरयाणात बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन जणांचा मृत्यू