पुण्यात घुमणार ढोलताशांचा आवाज, सर्वोच्च न्यायालयाने गणपती विसर्जन मिरवणुकीवरील निर्बंध केले स्थगित
पुण्यातील ढोलताशा पथकावर राष्ट्रीय हरित लवादाने लादलेले गणेश विसर्जन मिरवणुकीवरील निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शिथिल केले. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा आवाज घुमणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. बी. पारधीवाला व न्या. मनोज मिश्र यांच्या पूर्णपीठासमोर लवादाच्या निर्बंधांवर सुनावणी झाली. ढोलताशा पुण्याच्या हृदयात आहे. करू द्या त्यांना काय करायचे ते, असे सांगत न्यायालयाने लवादाच्या निर्बंधांना अंतरिम स्थगिती दिली. तसेच याप्रकरणी नोटीसही पूर्णपीठाने जारी केली. न्यायालयाने निर्बंध स्थगित केल्याने ढोलताशा पथकांना दिलासा मिळाला आहे.
लवादाच्या निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. या अपिलावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती पूर्णपीठासमोर करण्यात आली. त्याची दखल घेत या अपिलावर गुरुवारी तातडीने सुनावणी झाली. पुढच्या आठवडय़ात गणपती विसर्जन आहे. लवादाच्या निर्बंधांमुळे ढोलताशा पथकांसमोर अडचण निर्माण झाली आहे, असे अॅड. अमित पै यांनी पूर्णपीठाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत पूर्णपीठाने हे निर्बंध स्थगित केले.
काय होते निर्बंध
– ढोलताशा पथकात 30 पेक्षा अधिक वादक नसावेत.
– ढोलताशामुळे आवाजाचे प्रदूषण होत नाही ना यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष ठेवावे.
– नियमांचे उल्लंघन झाल्यास ढोलताशा पथकाचे साहित्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त करावे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List