निवडणुकीपूर्वी तरी आम्हाला ‘लाडके’ माना! होमगार्ड्सचे बाप्पांना साकडे

निवडणुकीपूर्वी तरी आम्हाला ‘लाडके’ माना! होमगार्ड्सचे बाप्पांना साकडे

>> मंगेश हाडके

गणेशोत्सव, नवरात्र, पालखी सोहळा, विविध सण-उत्सव, निवडणुका या काळातील बंदोबस्त असो की कोरोनासारख्या महामारीचा संकटकाळ असो, प्रत्येक वेळी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून, उन्हा-पावसाची तमा न बाळगता महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे (होमगार्ड्स) जवान चोख बंदोबस्त ठेवतात. गणेशोत्सवकाळात प्रत्येक मंडळासमोर होमगार्ड्स अहोरात्र सेवा देतात. मात्र, त्यांना हक्काचे मानधन, कायमस्वरूपी काम या रास्त मागण्यांसाठी सतत झगडावे लागत आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी आम्हाला ‘लाडके’ मानावे आणि आमच्यावरील दुःख दूर करून सुखाचे दिवस द्यावेत, यासाठी सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना होमगार्ड्स आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला करीत आहेत.

होमगार्ड्स हे एक साहाय्यकारी दल आहे. पोलीस दलाअंतर्गत सुरक्षा राखण्याकरिता साहाय्य करणे हे होमगार्ड्स संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी साहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्ये या दलाला पार पाडावी लागतात. अग्निशमन, विमोचन, पूरस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळ्या प्रकारच्या आपत्तीजनक परिस्थितीच्या वेळी होमगार्ड्स संघटना कार्यरत केली जाते.

पुणे जिल्ह्यात होमगार्ड्सची चार हजार ६०० पदे मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात दोन हजार ४०० होमगार्ड्स कार्यरत असून, नुकतीच १८०० जागांसाठी होमगार्ड्सची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली आहे. होमगार्ड्सना एका दिवसासाठी ६७० रुपये मानधन मिळते. मात्र, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पालखी सोहळा असे काही निवडक सण-उत्सव सोडल्यास होमगार्ड्सना नियमितपणे काम मिळत नाही. होमागाईसना कायमस्वरूपी काम मिळावे, त्यांचे मानधन ६७० रुपयांऐवजी १३०० रुपये करण्यात यावे, जेवण आणि प्रवासभत्त्यात वाढ करावी, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या धर्तीवर होमगार्ड्सनाही सरकारी रुग्णालये, महापालिका, जिल्हा परिषद अशी सरकारी कार्यालये, कंपन्या या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीत घेण्यात यावे, अशा विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही.

होमगार्ड्ससाठी जिल्हास्तरावर कार्यालयप्रमुख म्हणून काम पाहण्यासाठी जिल्हा समादेशकपद आहे. त्यावर आतापर्यंत मानधनावर नियुक्ती केली जात होती. मात्र, २०१६मध्ये या पदावर पोलीस खात्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, तर शहर आणि तालुकापातळीवर होमगार्ड्सचे मानसेवी समादेशक अधिकारी कार्यरत आहेत. मानधनावर काम करण्यास फारसे कोणी तयार होत नसल्याने अगर अन्य काही कारणांमुळे बहुतांशी जिल्ह्यांतील या जागा रिक्त आहेत. त्यामुळे हे पद मानसेवीऐवजी कायमस्वरूपी करण्यात यावे, असा प्रस्ताव होता. मात्र, त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे.

लाडक्या बहिणी ‘साठी होमगार्ड्सच्या मानधनवाढीचा प्रस्ताव स्थगित
होमगार्ड जवानांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव होमगार्ड्सचे महासमादेशक यांच्यामार्फत सहा महिन्यांपूर्वी वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण’ सारख्या विविध योजनांसाठी निधी खर्च होत असल्याने शासनाच्या तिजोरीत निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे शासनाने होमगार्ड जवानांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित ठेवला आहे. त्यामुळे होमगार्ड्समध्ये राज्य सरकारविरोधात तीव्र संताप आहे.

होमगार्ड्सचे मानधन आणि त्यांना कायमस्वरूपी करण्याचे प्रश्न शासनस्तरावरून सोडविण्यात येतात. मात्र, होमगार्ड जवानांना ज्या दिवशी बंदोबस्त असेल, त्या दिवशी राहण्याची सोय करण्यासंदर्भात संबंधित संस्थेला सूचना देण्यात येतात. होमगार्ड्सचे मानधनही वेळेत देण्याचा प्रयत्न असतो. ज्या संस्थांमार्फत त्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे, त्यांच्याकडे निधी शिल्लक असल्यास त्वरित मानधन जमा होते. मात्र, निधी शिल्लक नसल्यास निधी उपलब्ध झाल्यावर संबंधित संस्था त्वरित मानधन जमा करतात.
-रमेश चोपडे (पुणे जिल्हा समादेशक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक, होमगार्ड)

राज्य शासनाकडून होमगार्ड्सचे प्रश्न सोडविण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यांचे मानधन आणि कायमस्वरूपी करण्याचे प्रश्न प्रलंबित आहेतच, मात्र बंदोबस्तासाठी त्यांना जेवणभत्ता, प्रवासभत्ता लागू असताना हे भत्तेही त्यांना वेळेवर व नियमितपणे भेटत नाहीत.
– अमोल डोलारे (समादेशक अधिकारी)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वारकरी, बालगृहातील शिक्षकेतर कर्मचारी, धान उत्पादक, ब्राह्मण, राजपूत, कुणबी समाज, दूध...
आज सिनेटसाठी मतदान! युवासेनेचे 10 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात
आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार
बेस्टच्या वाहक-चालकांना संरक्षण द्या, वडाळा आगारात कामगारांची निदर्शने
भरत राजाप्रमाणे चार महिने राज्यकारभार पाहणार, नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला पदभार
चाइल्ड पॉर्न पाहणे आणि डाऊनलोड करणे हा गुन्हाच, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला मद्रास हायकोर्टाचा निकाल
जुन्या पेन्शनसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार आत्मक्लेश आंदोलन