आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार

आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडय़ांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी आज एन्काऊंटर केला. ठाणे क्राइम ब्रँच युनिट एकचे पथक अक्षयला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी ठाण्याला घेऊन येत असताना व्हॅनमध्येच अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. अक्षयने तीन राऊंड फायर केले. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय जागीच ठार झाला. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता मुंब्रा बायपास येथे घडली. अक्षयने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात अडकलेल्या भाजपच्या बडय़ा धेंडांना वाचवण्याकरिता पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचे एन्काऊंटर करण्यात आले का? गृह खात्याचा एपूण कारभारच यामुळे संशयाच्या भोवऱयात सापडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अक्षय शिंदेविरोधात बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. या अत्याचाराव्यतिरिक्त आणखी दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे अक्षयवर दाखल होते. अक्षयची पहिली पत्नी लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी त्याला सोडून गेली होती. तिने अक्षयविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या तक्रारीनुसार कल्याण कोर्टाने अक्षयला पोलीस कोठडी सुनावली.

मुंब्य्राच्या वाय जंक्शनवर थरार

अक्षयच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ठाणे क्राइम ब्रँचचे पथक आज 4 वाजता तळोजा तुरुंगात गेले. बदलापूर पोलिसांकडून अक्षयचा ताबा घेऊन ते परतत होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांची व्हॅन मुंब्रा बायपास येथील वाय जंक्शन येथे आली असता अचानक अक्षयने शेजारी बसलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून तीन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्या. या गोळीबारात नीलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. या वेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. त्यात अक्षयच्या डोक्याला गोळी लागून तो जागीच ठार झाला. दरम्यान अक्षयचा मृतदेह आधी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. मात्र शवविच्छेदनासाठी तो मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

धनदांडग्यांना वाचवण्यासाठी माझ्या पोराला मारून टाकले – अक्षयच्या कुटुंबीयांचा आरोप

अक्षयला मी आज साडेतीन वाजता तळोजा कारागृहात भेटून आलो. माझ्या पोराला पिचकारीची बंदूक माहीत नाही. मग तो पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार कसाकाय करू शकतो? पोलिसांनी पैसे घेऊन माझ्या पोराला मारून टाकले, असा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला आहे, तर एक महिना होऊनही शाळेचे फरार पदाधिकारी पोलिसांना सापडत नाहीत. धनदांडग्यांना वाचवण्यासाठी माझ्या पोराला या प्रकरणात अडकवल्याचा संताप त्याच्या आईने केला. पोराला ठार मारले. आता आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, असा टाहो त्याच्या पालकांनी फोडला.

फरार आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षयचे एन्काऊंटर करून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?

बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेले नाही. ते फरार आहेत. त्यांना अद्यापही अटक का होऊ शकत नाही. फरार आरोपींना वाचवण्यासाठीच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचे सत्य समजण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

एन्काऊंटर प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असून ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी होणार आहे.

मृतदेह ताब्यात घेणार नाही

या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमचा पोलिसांवर संशय आहे. या प्रकरणाला पोलीस आणि शाळा व्यवस्थापनच जबाबदार आहे, असे सांगतानाच आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका अक्षयची आई आणि त्याच्या भावाने घेतली. तुरुंगात पोलिसांनी अक्षयला खूप मारले. हे प्रकरण दाबण्यासाठीच पोलिसांनी त्याला ठार मारले, असा आरोपही त्यांनी केला.

तपासानंतर अधिक माहिती समोर येईल- मुख्यमंत्री

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भातील तपासासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. याच दरम्यान अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पोलीस अधिकारी निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मला समजली आहे. या सर्व घटनेबाबत पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधक आधी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते आणि आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बाजूने बोलत आहेत. महाराष्ट्र पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, हे योग्य नाही, असे शिंदे म्हणाले.

पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात? – वडेट्टीवार

अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?, अशा प्रश्नांची सरबत्ती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

अक्षय शिंदे मृत्यू प्रकरण संशयास्पद

संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असून महाराष्ट्राचा यूपी, बिहार करण्याचे राज्यकर्त्यांनी ठरवले आहे. राज्यात, देशात कायदे आहेत. अक्षय शिंदेला फाशी होणार होती. ती त्याला मिळालीच असती. मात्र अशा पद्धतीने एन्काऊंटर करून राज्यकर्त्यांनी संशय निर्माण केला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे बदलापूर शाळेतील संचालक फरार आहेत, सीसीटीव्ही गायब आहेत. यामुळे हे प्रकरण पूर्ण संशयास्पद आहे. लोकांचा संशय दाट होणार आहे. कोणीतरी मोठी व्यक्ती अडकल्यामुळे हा प्रकार घडला असावा, आरोपी गाडीत असताना आणि गाडीत पोलीस असताना अक्षय शिंदे पोलिसांच्या बंदुकीला हातच कसा लावू शकतो? या प्रकरणाला पोलीसच जबाबदार आहेत. ही राजकीय हत्याच आहे, असेही आव्हाड म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असलेल्या बदलापूर पूर्वेतील नामांकीत शैक्षणिक संस्थेत शिशू वर्गात शिकणाऱया दोन चिमुकलींसोबत अक्षय शिंदे या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केले. ही घटना 12 व 13 ऑगस्ट रोजी घडली होती. पालकांनी शाळेकडे धाव घेऊन दाद मागितली असता संस्थाचालक आणि शाळेच्या पदाधिकाऱयांनी ही घटना आमच्या शाळेत घडलीच नाही, असे सांगून त्यांना हाकलून दिले. राजकीय दबावामुळे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. सर्व स्तरातून संताप व्यक्त होताच तब्बल 11 तासांनी नराधम अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र पोलीस या घटनेचा योग्य तपास करत नसल्याच्या निषेधार्थ 20 ऑगस्ट रोजी उत्स्फूर्तपणे बदलापुरात जनआंदोलन झाले. आठ तास नागरिकांनी रेल रोको केला. यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

बुरखा घातलेल्या अक्षयला रिव्हॉल्व्हर कशी दिसली?

या घटनेची बातमी देशातील सर्वच वृत्तवाहिन्यांवरून झळकली आणि विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. अक्षयला डोक्यावर बुरखा घालून आणि हातकडी घालून नेले जात होते. मग त्याला बुरख्यातून आणि हातकडीने जखडलेल्या हाताने पोलिसांचे रिव्हॉल्वर कसे दिसले? ते त्याने कसे हिसकावून घेतले. पोलीस अधिकाऱयांचे रिव्हॉल्व्हर लॉक असते. ते लॉक काढल्यानंतरच गोळीबार करता येतो. मग अक्षयने इतक्या वेगाने लॉक उघडून कसा गोळीबार केला? या प्रकरणातून उपमुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याचा कारभार संशयाच्या भोवऱयात सापडला आहे. या प्रकरणात पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे गेल्या महिनाभरापासून फरार आहेत. त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. भाजपच्या या बडय़ा धेंडांना वाचवण्यासाठीच अक्षयचा एन्काऊंटर करून पुरावा नष्ट करण्यासाठी हे एन्काऊंटर झाले आहे का, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवरून व्यक्त होत आहेत.

या प्रकरणाचा राजकीय वापर होईल – आदित्य ठाकरे यांचा संताप

बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष पृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. या घटनेचा वापर करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील, असे नमूद करत शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

ही सायलेन्ट कोल्ड ब्लडेड मर्डर — पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही एक सायलेन्ट कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा आरोप केला. हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद पृत्य केले, असे चव्हाण म्हणाले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले? असा सवालही त्यांनी केला. अक्षय शिंदे हा काही दहशतवादी नव्हता आणि त्याने काही सोबत बंदूक आणलेली नव्हती. त्याने बोलू नये म्हणून त्याला शांत करण्यात आले आहे. या प्रकरणात एन्काऊंटर होणे हे अतिशय हास्यास्पद आहे. हे नेमकं चाललंय काय, गृहमंत्र्यांचा काही पंट्रोल आहे की नाही? सरन्यायाधिशांनी आता या प्रकरणात स्वतः लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी विनंतीही चव्हाण यांनी केली. गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी चव्हाण यांनी केली.

फरार आरोपींना वाचविण्यासाठी एन्काऊंटर केला का?

अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी पैसे घेऊन ही हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेवर पाच गंभीर प्रश्न उपस्थित केले.

1 पोलीस अधिकारी इतके बेसावध आणि निष्काळजीपणे आरोपींना घेऊन जातात का? ही अत्यंत गंभीर बाब आहे.
2 फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?
3 फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या तरी आदेशावरून त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे का?
4 प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
5 कस्टडीत आरोपींना संपवून प्रकरण दाबण्याचा उत्तरेतील राज्यातला पॅटर्न महाराष्ट्रात आणला जात आहे का?

फरार संस्थाचालक अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात; विचित्र योगायोगाची चर्चा

बदलापूरच्या शाळेचे फरार अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव आणि अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची घटना आज एकाच दिवशी घडली. या विचित्र योगायोगाची आज बदलापुरात उलटसुलट चर्चा सुरू होती. हायकोर्टाच्या निर्देशानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्यावर पोक्सो दाखल झाला. मात्र त्यानंतर गेल्या महिनाभरापासून कोतवाल आणि आपटे फरार आहेत.

सरकारने दिले चौकशीचे आदेश

एन्काउंटवर विरोधकांनी संशय व्यक्त केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद

आरोपीला नेताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय. घटनेची सखोल चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली.

शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?

या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवाछपवीचा काही संबंध आहे का? याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वारकरी, बालगृहातील शिक्षकेतर कर्मचारी, धान उत्पादक, ब्राह्मण, राजपूत, कुणबी समाज, दूध...
आज सिनेटसाठी मतदान! युवासेनेचे 10 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात
आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार
बेस्टच्या वाहक-चालकांना संरक्षण द्या, वडाळा आगारात कामगारांची निदर्शने
भरत राजाप्रमाणे चार महिने राज्यकारभार पाहणार, नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला पदभार
चाइल्ड पॉर्न पाहणे आणि डाऊनलोड करणे हा गुन्हाच, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला मद्रास हायकोर्टाचा निकाल
जुन्या पेन्शनसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार आत्मक्लेश आंदोलन