कडक उन्हामुळे कलिंगडसह लिंबाला वाढती मागणी; लिंबाच्या दरात वाढ
दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असल्याने कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाचे भाव आटोक्यात असल्याने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी हंगामात कलिंगडाचे उत्पादन घेतात. सध्या कलिंगडास गुणवत्तेनुसार व आकारानुसार 10 ते 12 रुपये किलो भाव मिळत आहे. अनेक व्यापारी शेतातच कलिंगड खरेदी करत आहेत. गावागावांत, मुख्य रस्त्यांच्या बाजूला अनेक छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांनी कलिंगडाच्या विक्रीचे स्टॉल लावले आहेत. 30, 40, 50, 60 रुपयांना कलिंगडाची विक्री होत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने जवळा, पिंपळनेर, नाथापूर, ताडसोन्ना, घाटसावळी येथील बाजारात कलिंगडास मागणी वाढली आहे. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कलिंगडामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. कलिंगड हा आहारातील फायबरचा चांगला स्त्रोत आहे.
उन्हामुळे घामाघूम जिवाला थंडावा देणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली असून, पिंपळनेरच्या बाजारात लिंबू खरेदीला ग्राहकांची गर्दी वाढत आहे. वाढत्या तापमानाचा फटका लिंबू उत्पादनाला बसल्याने आवक कमी आणि मागणी जास्त आहे. बाजारात एका लिंबूसाठी 5 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत.
उन्हाळा असह्य होत असल्याने लिंबू सरबतावर भर दिला जात आहे. त्यामुळे बाजारात लिंबू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. आकारानुसार आणि रसाच्या क्षमतेनुसार दर निश्चित करण्यात आले असून किमान 5 रूपये तर कमाल 10 रूपये असे लिंबूचे दर आहेत. मागणी असल्याने ठिकठिकाणी लिंबू सरबताचे स्टॉल्स बसलेले आहेत. हॉटेल, कोल्ड्रींक हाऊस येथेही उन्हाळा वाढला की, लिंबूची मागणी वाढते. मागणीच्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. उन्ह वाढले की, लिंबूचा ताजेपणा कमी होत असल्याने खरेदीच्या दिवशीच विक्रि करावी लागते, मात्र दरवाढ होऊनही लिंबू खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद आहे. लिंबू सरबत करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नाश्त्यासोबत लिंबूची मागणी वाढली आहे. रोजच्या भाजीपाल्याच्या खरेदीतही लिंबूची संख्या वाढत आहे. सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने केटरिंग व्यावसायिकांकडून लिंबू खरेदीला प्राधान्य दिले जाते. होलसेल मार्केटला लिंबूची उचल करण्यासाठी विक्रेत्यांची कसरत होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List