औटघटकेची ऑरेंज कॅप; पूरनने तासाभरात सुदर्शनच्या डोक्यावरून काढली ऑरेंज कॅप
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 18 वा हंगाम आता मध्यावर आलाय. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेत रंगत निर्माण झाली आहे. ‘ऑरेंज कॅप’ आणि ‘पर्पल कॅप’साठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. शनिवारी (दि.19) आयपीएलमध्ये दोन सामने झाले. यात साई सुदर्शनने ऑरेंज कॅप पटकाविली, मात्र त्याची ही ऑरेंज कॅप औटघटकेचीच ठरली. कारण अवघ्या तासाभरात निकोलस पूरनने पुन्हा ऑरेंज कॅपवर कब्जा केला.
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 धावांची खेळी खेळल्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आला होता, मात्र रात्रीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर चढविली. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात निकोलस पूरन 11 धावांवर बाद झाला. साई सुदर्शनने यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 365 धावा फटकाविल्या आहेत. निकोलस पूरनने 7 डावांत 357 धावा केल्या होत्या. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पूरनने 9 धावा काढताच सुदर्शनला मागे सोडले आणि ऑरेंज कॅप परत मिळवली. चालू हंगामात त्याच्या खात्यात एकूण 368 धावा जमा आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत साई सुदर्शन आणि निकोलस पूरन यांच्यात आता केवळ 3 धावांचा फरक आहे. निकोलस पूरन आणि साई सुदर्शन दोघेही आयपीएलमध्ये 52 च्या सरासरीने फटकेबाजी करत आहेत.
ऑरेंज कॅपसाठी रस्सीखेच!
निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 368 धावांसह आघाडीवर आहे, तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 365 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सुदर्शनच्या संघाचा जोस बटलर तिसऱ्या स्थानावर आहे. बटलरने आतापर्यंत 315 धावा केल्या आहेत. 299 धावा करणारा लखनौ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श चौथ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा के. एल. राहुल 266 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List