रोबोटची माणसासोबत लागली ‘रेस’, सर्वात वेगवान रोबो दीड तास मागे
चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक अनोखी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. येथे चक्क एक रोबोट स्पर्धकांसोबत तब्बल 21 किलोमीटर धावला. मानवासोबत एवढे अंतर धावण्याची रोबोटची पहिलीच वेळ आहे. या मॅरेथॉनमध्ये चीनमधील ड्रॉइडअप आणि नोएटिक्स रोबोटिक्ससारख्या कंपन्यांच्या रोबोट्सनी भाग घेतला. वेगवेगळ्या उंचीचे रोबोट सर्वांचे लक्ष वेधत होते. सर्वात वेगवान रोबोटला 21 किमी मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी 2 तास 40 मिनिटे लागली. रोबोट्सना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे प्रशिक्षक मागे धावत होते, पण अनेक रोबोट मार्ग चुकले आणि एकमेकांवर आदळले. काही रोबोटची उंची तर चार फुटांपेक्षा कमी होती. बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंग जिह्यात ही स्पर्धा पार पडली. चीनने गेल्या काही वर्षांत रोबोटिक्समध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. या बाबतीत त्यांनी जर्मनी आणि जपानला मागे टाकले आहे.
रोबोट मानवी स्पर्धकापासून खूप दूर
बीजिंग इनोव्हेशन सेंटर ऑफ ह्यूमन रोबोटिक्सच्या ‘तियांगोंग अल्ट्रा’ या रोबोटने 2 तास 40 मिनिटांत अंतर गाठले, पण तो मानवी स्पर्धकापासून बराच दूर राहिला. विजेत्या स्पर्धकाला हे अंतर गाठण्यासाठी फक्त 1 तास 2 मिनिटे लागली. सर्वात कमी वेळेत 21 किमी मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम जेकब किप्लिमो (56 मिनिटे 42 सेकंद) यांच्या नावावर आहे. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना पाणी पिण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे रोबोटची बॅटरी बदलण्याची परवानगी देण्यात आली होती. या स्पर्धेचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रोबोट्सना आधार देणारे मानवी प्रशिक्षक त्यांच्यासोबत असल्याचे दिसते.
तीन वेळा बॅटरी बदलली
‘‘शर्यतीदरम्यान तियांगोंग अल्ट्राला त्याच्या लांब पायांमुळे आणि अल्गोरिदममुळे मदत झाली. त्यामुळे तो इतर मानवी स्पर्धकांप्रमाणे धावू शकला, पण यासाठी त्याच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन करावे लागेल. शर्यतीदरम्यान रोबोटच्या बॅटरी फक्त तीनवेळा बदलण्यात आल्या,’’ असे रोबोटिक्स सेंटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तांग जियान म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List