गोकुळधाममधील गिरणी कामगारांच्या वसाहतीतील रहिवाशांची स्वयंपुनर्विकासाला पसंती, ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी केले मार्गदर्शन
गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाममधील गिरणी कामगारांच्या वसाहतीमधील रहिवाशांनी विकासकाकडून पुनर्विकास करण्याऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती दिली आहे. स्वयंपुनर्विकासाबाबत प्रख्यात वास्तुविशारद व गृहनिर्माणतज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी रहिवाशांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
गोकुळधाम परिसरात आरएमएमएस सेक्टरमधील 22 इमारतींतील 1000 कुटुंबे राहतात. 1983 मध्ये गिरणी कामगारांसाठी या इमारती बांधल्या गेल्या. या सर्व इमारतींना 40 वर्षे झाल्यामुळे येथील रहिवाशांना इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु या सेक्टरमधील सामायिक रोड, मैदाने, गार्डन इत्यादींचे हस्तांतरण पूर्वीच्या विकासकाने अजूनही केलेले नसल्यामुळे पुनर्विकासात बाधा येत आहे. स्थानिक फेडरेशनसुद्धा याबाबत काहीही प्रयत्न न करता विकासकांमार्फत पुनर्विकास करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यासाठी त्यांनी घाईघाईने पीएमसीची नेमणूकही केली आहे. मात्र, येथील अधिकाधिक रहिवाशांचा कल हा स्वयंपुनर्विकासाकडे आहे.
सरकारकडून स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन
विकासकांमुळे अडकलेल्या अनेक प्रकल्पांचा विचार करता सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी अनेक शासकीय निर्णय जाहीर केले आहेत. अधिक एफएसआय, आर्थिक सहाय्य, एक खिडकी पद्धत आणि एक महिन्यात डीम्ड कन्व्हेयन्स अशी अनेक प्रोत्साहने सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहेत.
स्वयंपुनर्विकासात जास्त जागा, चांगल्या सुविधा
स्वयंपुनर्विकासामुळे आपली जमीन ही अपरिवर्तनीय संमतीपत्राच्या माध्यमातून विकासकाच्या घशात न घालता येथेच सर्वांनी मिळून आपल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास केल्यास सभासदांना खूप अधिक जागा, चांगल्या सुखसोयी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. त्याशिवाय विकासकाकडून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीचा व कदाचित आहे ती घरे जाऊन बेघर होण्याचा धोकाही टाळता येऊ शकतो. आज मुंबईत सुमारे 4 हजार 310 प्रकल्प अडकलेले आहेत. यातील हजारो कुटुंबे बेघर झालेली किंवा होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे स्वयं पुनर्विकास हा योग्य मार्ग असल्याचे प्रभू म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List