महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे महासंकट! 358 गावे, 1026 वाड्यावस्त्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे महासंकट ओढवले आहे. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आली आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या 16 जिह्यांमधील 358 गावे, 1026 वाडीवस्त्यांना 478 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मार्च महिन्यापासूनच राज्यातील अनेक जिह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. एप्रिलच्या मध्यावर ती परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. सूर्य आग ओकतोय आणि खाली जमीन तापली आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. विहिरींची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. राज्यात विशेषकरून मराठवाड्यातील जिह्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिह्यातील पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. मराठवाड्यातील जिह्यांना रोज किमान 250 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या एक हजार टँकर्सवर पोहोचली होती. त्यातील सर्वाधिक टँकर्स छत्रपती संभाजीनगर जिह्याला पुरवावे लागत आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे कोरडे पडू लागले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिह्याला सर्वाधिक टँकर्स लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता इतर जिह्यांना रोज टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. सातारा आणि पुणे जिह्याला सर्वाधिक टँकर्स पुरवावे लागत आहेत.
विदर्भातील पाणी परिस्थिती चांगली
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली. परंतु तेथील पाणी परिस्थिती मात्र राज्यात सर्वात चांगली आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिह्यांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात असून गेल्या तिथे अद्याप टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेला नाही.
‘स्मार्ट सिटी’ सोलापुरात 7 दिवसांआड पाणी
सोलापूर हे राज्यातील नव्हे; तर देशातील ‘स्मार्ट सिटी’त गणले जाणारे शहर. शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी एक हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. तरीही शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. ऐन उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असून, अलीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन शाळकरी मुलींना जीव गमवावा लागला. तरीही या पाणीपुरवठा नियोजनाकडे लक्ष दिले जात नाही. भर उन्हाळ्यात शहरासह हद्दवाढ भागात तीव्र पाणीटंचाई असून, सध्या शहरात 7 दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीबाणीला तोंड द्यावे लागत आहे.
मिंध्यांच्या ठाणे जिह्यात पाण्याचे दुर्भिक्ष
कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिह्यांपैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती अद्याप चांगली आहे. ठाणे जिह्यात मात्र अनेक गावे आणि वाडीवस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवावे लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List