देशात उष्णतेची लाट; नागपूर देशातील सर्वात ‘हॉट शहर’, तापमान 44.7 अंशांवर
महाराष्ट्रासह देशात उष्णेतेच्या प्रचंड लाटेने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मुंबई आणि परिसरात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णतेसह प्रचंड उकाडाही जाणवत आहे. राज्यावरील अवकाळीचे सावट दूर झाले असून आता पुन्हा उष्णतेची लाट राज्यात आली आहे. आणखी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहणार असून उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात सकाळी 9 वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर हे देशातील हॉट शहर ठरले आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी 44 अंश कमाल तर 28 अंश किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान झपाट्याने वाढले आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात शनिवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान 44.7 अंश सेल्सिअसवर पोहचले. शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम आता धरणातील जलसाठ्यावर दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 5.22 टक्के कमी साठा आहे. 17 एप्रिल 2024 रोजी धरणात 53.23 टक्के जिवंत पाणीसाठा होता, तो यंदा 48.31 टक्के एवढा आहे. यंदा मार्चपासूनच तापमान चाळिशीच्या पार गेले. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List