शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; रेड कॉर्नर नोटीससाठी बांगलादेशचा इंटरपोलशी संपर्क
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.शेख हसीना यांच्यावर कारवाई करण्यासाठी बांगलादेश आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने (NCB) इंटरपोलला 12 लोकांविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. या यादीत पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचेही नाव आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बांगलादोशमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर 77 वर्षांच्या शेख हसीना यांनी गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे. ढाका येथील हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर हसीना बांगलादेशातून पळून गेल्या होत्या. या चळवळीने त्यांच्या पक्ष अवामी लीग (एएल) च्या 16 वर्षांच्या राजवटीचा अंत केला.
द डेली स्टारच्या मते, एनसीबी अशा विनंत्यांवर न्यायालये, सरकारी वकील किंवा तपास संस्थांकडून आलेल्या अपिलांच्या आधारे प्रक्रिया करते. सहाय्यक पोलिस महानिरीक्षक (मीडिया) एनामुल हक सागर यांनी पोलिस मुख्यालयात सांगितले की, “हे अर्ज तपासादरम्यान किंवा कोणत्याही चालू खटल्याच्या कार्यवाहीत उद्भवणाऱ्या आरोपांच्या संदर्भात दाखल केले आहेत. इंटरपोलद्वारे प्रत्यार्पण किंवा इतर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यासाठी तात्पुरते अटक करण्यासाठी रेड नोटिसचा वापर केला जातो. इंटरपोल परदेशात राहणाऱ्या फरार आरोपींचा माग काढण्यास मदत करते आणि एकदा पुष्टी झाली की, संबंधित अधिकाऱ्यांसोबत माहिती शेअर केली जाते.
बांगलादेशमध्ये, अंतरिम सरकारने 8 ऑगस्ट रोजी देशाची सूत्रे हाती घेतली आणि या सरकारमध्ये मुहम्मद युनूस यांना मुख्य सल्लागाराची जबाबदारी देण्यात आली. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांनंतर, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) हसीना आणि अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार, लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांविरुद्ध नरसंहार केल्याच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, आयसीटीच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाने हसीना आणि इतर फरार आरोपींना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याची औपचारिक विनंती पोलिस मुख्यालयाला केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List