पाच मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारी एकमेव अभिनेत्री, शेवटची ‘ती’ इच्छा राहिली होती अपूर्ण
बॉलिवूडपासून साऊथ सिनेमापर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अफेअर्सपासून ते त्यांच्या प्रोफेशनल लाईफपर्यंतच्या गोष्टी लोकांना जाणून घ्यायच्या होत्या. पण 1-2 नव्हे तर 5-5 मुख्यमंत्र्यांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तरुण वयात अभिनयाला सुरुवात केलेल्या या अतिशय सुंदर अभिनेत्रीने शेवटच्या श्वासापर्यंत सिनेमात काम करणे सोडले नाही. या अभिनेत्रीची शेवटची इच्छा मात्र, पूर्ण होऊ शकली नाही. आता ही अभिनेत्री कोण आहे चला जाणून घेऊया…
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून मनोरमा आहे. ती ‘आची’ या नावाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ओळखली जाते. त्यांच्या अभिनयाची कधीही कोणासोबत तुलना होऊ शकत नाही. आजही त्यांची जागा कोणतीही अभिनेत्री घेऊ शकत नाही. मनोरमा यांनी 1500 हून अधिक चित्रपट आणि 5000 नाटकांमध्ये अभिनय करून गिनीज बुकमध्ये स्वत:च्या नावाची नोंदणी केली होती. त्यांनी नाटक, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये जवळपास ५० वर्षे काम केले होते.
तामिळनाडूची ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून मनोरमा ओळखल्या जायच्या. त्यांनी लोकांना हसायला भाग पाडले होते. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य तितकेसे आनंदी नव्हते. अगदी लहान वयात त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी आईच्या आजारपणामुळे त्यांना शाळा सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांनी घरकाम करायला सुरुवात केली. पण वयाच्या 12 व्या वर्षी मनोरमाला चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी २०१३ पर्यंत अभिनयाची कारकिर्द सुरु ठेवली.
मनोरमा यांचे खरे नाव गोपी शांता असे होते. त्यांना वडील नसल्यामुळे आईनेच लहानाचे मोठे केले होते. त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी चित्रपटात काम करण्यापूर्वी रंगभूमीवरील नाटकात काम केले होते.त्यांनी काम केलेल्या नाटक कंपनीचे प्रमुख एस.एम. रामनाथन त्यांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. आईच्या इच्छेविरुद्ध लग्न झाल्याने मनोरमा यांना घर सोडावे लागले होते. त्यानंतर मनोरमा यांना मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर रामनाथन घरी आलेच नाहीत. त्यांनी पत्नी आणि मुलाला सोडून दिले. असे म्हटले जाते की मुलाच्या जन्माच्या वेळी एका ज्योतिषाने सांगितले होते की त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून एस.एम. रामनाथनने मनोरमा आणि मुलाला सोडून गेले. मनोरमाचे वडीलही अशाच पद्धतीने कुटुंब सोडून गेले होते.
दुःखद वैयक्तिक आयुष्य असूनही मनोरमा यांनी चित्रपट जगतात अनेक यश संपादन केले. दक्षिण भारतातील 5 मुख्यमंत्र्यांसोबत काम करणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अन्नादुराई आणि करुणानिधी यांनी मनोरमासोबत नाटकाच्या रंगमंचावर अभिनय केला. याशिवाय, जयललिता आणि एम.जी.आर. व एन.टी. रामाराव यांच्यासोबत तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. असे म्हटले जाते की मनोरमा यांच्या मनात एक इच्छा होती, जी शेवटपर्यंत अपूर्णच राहिली. त्यांना ट्रान्सजेंडर म्हणून काम करायचे होते, पण त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List