महत्त्वाची कामे नकोच… सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?
महत्त्वाच्या कामासाठी कसारा घाटातून जाणार असाल तर ही बातमी ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-नाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून येत्या सहा दिवसात या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवार, 24 फेब्रुवारी ते गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागणार आहे.
अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी
दरम्यान, जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. जव्हार, मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. या दिशेने प्रवास करणार असाल तर वाहनचालक, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळे वळविण्यात येणारी मार्ग लक्षात घेता मुंबई – नाशिक – शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे. नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारली जाणार आहेत.
जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात यांचा त्रास होणार नाही, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्यांकडून करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List