‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्यानं आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे हे सातत्यानं शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा जोरदार निशाणा सधाला आहे. मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांना मी आधीच सांगितलं होतं की मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता असलो तरी मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जे मला हलक्यात घेत आहेत, त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, एकनाथ शिंदे यांचा हा इशारा नेमका कोणासाठी होता? याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हटलं शिंदेंनी?
जेव्हा तुम्ही मला 2022 मध्ये हलक्यात घेतलं तेव्हा तुमचा टांगा पलटी झाला. मी सरकार बदललं. आम्ही सामान्य लोकांच्या मनातील सरकार आणलं. मी विधानसभेत माझ्या पहिल्याच भाषणात म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीस यांना दोनशे पेक्षा जास्त जागा मिळतील, आणि आम्हाला 232 जागा मिळाल्या. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. ज्या लोकांना हा इशारा समजून घ्यायाचा आहे, त्यांनी समजावा. मी फक्त माझं काम करत आहे.
एकनाथ शिंदेंना धमकी
एकनाथ शिंदे यांच्या कारला उडवून देऊ असा धमकीचा एक इमेल प्राप्त झाला होता. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून दोन व्यक्तींना अटक करण्यात आलं आहे.मंगेश वायल आणि अभय शिंगणे अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत. हो दोघेही देऊळगाव राजाचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज गोरेगावमधील जेजे मार्ग पोलीस ठाण्याला प्राप्त झाला होता.या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आलं आहे.
दरम्यान यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मला या आधी देखील अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, पण मी भीत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List