सत्ता आहे म्हणून ‘ऑपरेशन’, अन्यथा दुकान खाली होईल; ED, CBI आमच्या हातात दिली तर शहाही शिवसेनेत प्रवेश करतील! – संजय राऊत
सत्ता आहे म्हणून ऑपरेशन. सत्ता नसेल तेव्हा अख्खं दुकान खाली होईल. ईडी, सीबीआय दोन तासांसाठी आमच्या हातात द्या तेव्हा अमित शहाही मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेंसह सगळेच तेव्हा कलानगरच्या दारात दिसतील. त्यामुळे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्हीही सत्ता भोगली आहे. पण इतक्या विकृत पद्धतीने आणि सूड बुद्धीने सत्ता राबवली नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते रविवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या रामदास कदम यांचाही समाचार घेतला. माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, दुसऱ्यांना तोंड नाही का? सगळ्यांना तोंड आहेत. जो बाडगा असतो तो जोरात बांग देतो. त्यामुळे या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी. मिंधे गटाने आपला शत्रू कोण हे ठरवायला पाहिजे.
उद्धव ठाकरे किंवा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिले. त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे नैतिकतेला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या नसाल हे लक्षात घ्या. कधीकाळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. आपण त्यांच्यासोबत बसून तासन्तास बसून चर्चा केली आहे. आमदारकी, मंत्रीपदं मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले होते. ही कृतघ्नता राजकारणात नसेल तर माणुसकी शून्य आहे, असे राऊत म्हणाले.
शिवसेना नेते कोकणात जाणार
भास्कर जाधव यांच्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, माझ्या त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ते कोकणातील प्रमुख नेते आहेत. त्यांच्या घरात लग्न असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. ते ऑनलाईन हजर राहणार होते, मात्र मातोश्री परिसरात जामर असल्याने आणि निरोप थोडा उशिरा गेला. रुसायला, फुगायला आणि गावी जायला ते काही एकनाथ शिंदे नाहीत, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच शिवसेनेतील काही प्रमुख नेते कोकणात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List