पुनर्विकासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले, खोडा घालणाऱ्यांविरोधात कारवाईची केली मागणी
‘गरिबी और गंदगी से दूर,धारावी का विकास जरूर’, ‘धारावी का विकास, अभी नहीं – तो कभी नहीं’ , ‘घर घर में बोले नारी, अब धारावी के सुधार की बारी’, ‘मेरे बच्चो का पक्का घर, मेरा सपना’ अशा विविध संदेशांचे फलक घेत सायन स्थानकाबाहेर आज एक मोर्चा निघाला होता. धारावीतील सुमारे 3000 स्थानिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चाने धारावीतील रहिवाशांनी आपला पाठींबा विकासाला असून प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना थेट चपराक लगावली असल्याचे म्हटले जात आहे.
केवल स्वार्थासाठी अनेक वर्षांपासून रखडवलेला धारावीचा पुनर्विकास आता एकदाचा मार्गी लागणार आहे. धारावी पुनर्विकासाच्या बाजूने आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आणि या प्रकल्पात खोडा घालणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शनिवारी धारावीकरांनी प्रकल्पाच्या बाजूने मोर्चा काढला होता. या मोर्चाची सांगता महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) कार्यालयाबाहेर झाली. सोमवारी, या मोर्चातील शिष्टमंडळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. दि साऊथ इंडियन नाडार महाजन संघम, प्रगती महिला सेवा मंडळ यांसह अन्य संस्थांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्यांदाच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी अशा प्रकारे मोर्चा काढण्यात आला होता. या जनमोर्चाला, सकाळी 11.30 वाजता शीव रेल्वे स्थानकाबाहेरील सिग्नल जवळून सुरुवात झाली. सर्व वयोगटांतील रहिवाशांनी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर पूर्ण करावा, या मागणीसाठी रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या या मोर्चामुळे संपूर्ण धारावीत एक वेगळा संदेश गेला असून यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.
” गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या नव्या हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहोत. या नव्या घरांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुविधा असतील. मात्र काही राजकारणी विशेषतः गायकवाड भगिनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धारावी पुनर्विकासाला विरोध करत आहेत. अशा सर्व लोकांना धारावीकरांच्या मनातली भावना जाहीरपणे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमच्या हक्कांच्या घरासाठी आम्ही शासनाच्या मागे ठामपणे उभे राहून हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, याची मला खात्री आहे”
– एम नाडेश्वरन, स्थानिक रहिवासी
“देशाची आर्थिक राजधानी उभी करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या कामगार आणि कष्टकऱ्यांची धारावी आहे. आजवर गप्प बसून पुनर्विकासाचा तमाशा बघणाऱ्या धारावीकरांना आता जाग आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखणाऱ्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर धारावीची जनता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल”
– संजय गुप्ता, स्थानिक रहिवासी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List