अजितदादांनी भेट नाकारली का? सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली, राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, मात्र त्यांनी वेळ दिला नसल्याची बातमी समोर आली होती, आता यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
अजितदादांनी भेट नाकारली, असं काही नाही. अजितदादांनी मला भेट वगैरे काही नाकारलेली नाहीये. मी काही वेळ मागितली नव्हती. आदल्या दिवशी मागितली होती, पण मला जाता आलं नाही. अजितदादा हे वक्तशिरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळही मागितली नाही, मी गेलोही नाही. परंतु माध्यमांमध्येच अशा बातम्या आल्या की अजितदादांनी मला वेळ नाकारली. असं काहीही झालेलं नाही. मी परवाची वेळ मागितली होती फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही, हे मात्र खरं आहे, असा खुलासा सुरेश धस यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अद्यापर्यंत मी स्वत: धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागीतलेला नाहीये. राजीनामा त्यांच्याच पार्टीचे लोक मागत आहेत. त्यांची कोअर कमिटी त्यांच्याबरोबर असेल, अजितदादा त्यांच्याबरोबर असतील तर असतील तो त्यांचा प्रश्न आहे. तो आमच्या भारतीय जनात पार्टीचा प्रश्न नाहीये. प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि मी स्वत:अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. मी फक्त आरोप केले आहेत.
एसपी लेव्हलला काही पत्र द्यायचे आहेत, काही आयजी लेव्हलला पत्र द्यायचे आहेत. पोलीस दलातील काही लोक आकाला मदत करत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजेना, तुमचं काय मत आहे. माझी लढाई सुरूच आहे, अजून कुठं काय संपलंय. लढाई सुरूच राहील, आका, आकाचे लोक ज्यांनी-ज्यांनी संतोष देशमुख यांना मारलं ते फासावर जाऊस्तर लढाई सुरूच राहील. अजून काही बॉम्ब फोडायचे बाकी आहेत. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. मला असं कळतं की तिकडे एका रात्रीत रस्ते तयार होतात. जर वेळ मिळाला तुम्हाला तर मला वाटतं तुम्ही तिकडे एकदा परळीला जाऊन बघा, असा हल्लाबोल धस यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List