कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील ढमढेरे, तर उपाध्यक्षपदी मारूती जगताप
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीच्या शिरूर तालुक्यातील संचालक स्वप्नील ढमढेरे यांची अध्यक्षपदी, तर पुरंदर तालुक्यातील संचालक मारुती जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
भगवानराव पासलकर आणि भाऊ देवाडे यांनी प्रत्येकी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सुधीर खंबायत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली.
कात्रज दूध संघात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. स्वप्नील ढमढेरे हे शिरूर तालुक्यातील असून, त्यांचे वडील बाळासाहेब ढमढेरे हे देखील संघाचे संचालक होते. तर, उपाध्यक्षपदी निवड झालेले मारुती जगताप हे काँग्रेसचे आहेत. त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आल्यामुळे संचालक मंडळात देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.
अजित पवार गटाकडून उपाध्यक्ष !
■ उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या मारुती जगताप यांची निवड करण्यात आली. त्यामुळे अजित पवार गट हा सत्तेत महायुती बरोबर असला तरी प्रत्यक्ष दूध संघात मात्र काँग्रेसच्या संचालकाला उपाध्यक्षपद दिल्याने हा राजकीय चर्चेचा विषय झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List