डोळे पांढरे करणाऱ्या सिडकोच्या घरांची उद्या लॉटरी, 26 हजार घरांसाठी फक्त 21 हजार अर्ज
माझ्या पसंतीचे घर या गोंडस नावाखाली सिडकोने आणलेल्या महागड्या घरांची सोडत येत्या शनिवारी तळोजा येथे काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडकोने मोठा गाजावाजा करून 26 हजार घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. या घरांच्या किमती 10 ते 20 टक्क्यांनी कमी असतील असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात किमती जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांचे अक्षरशः डोळे पांढरे झाले झाले. सर्वसामान्यांना हक्काचा निवारा देण्याऐवजी सिडकोने आता बिल्डरप्रमाणे घरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून 26 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेची घोषणा सिडकोने 12 ऑक्टोबर 2024 रोजी केली होती. त्यावेळी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी किमती कमी करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणूक झाल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले. किमती कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. खारघर येथील घर 45 लाख रुपये तर वाशी येथील घर थेट 74 लाख रुपयांवर नेण्यात आले. किमती जाहीर होण्यापूर्वी या घरांसाठी सुमारे दोन लाख ग्राहकांनी ऑनलाइन लॉगिन केले होते. मात्र त्यापैकी फक्त आता 21 हजार ग्राहकांनीच सोडतीसाठी अनामत रक्कम भरलेली आहे.
सर्वांनाच मिळणार घर
सिडकोने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये 26 हजार घरे असली तरी अर्ज फक्त 21 हजार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जे अर्जदार या योजनेत सहभागी झाले आहेत, त्या प्रत्येकाला घर मिळणारच आहे. दिवाळी-2022 या लॉटरीत सहभागी झालेल्या सर्वच अर्जदारांना घरे मिळाली होती. या लॉटरीमध्येही अनेक अर्जदार घरे परत करणार असल्याचा अंदाज रियल इस्टेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
लॉटरीचे थेट प्रक्षेपण
तळोजा येथील पंचानंद परिसरातील सेक्टर 1 मध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीचे थेट प्रक्षेपण सिडको होम्स डॉट कॉम या वेबसाईटवर दाखवण्यात येणार आहे. अर्जदार त्यांच्या सिडको होम खात्यात लॉगिन करूनही सोडतीचा निकाल पाहू शकणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List